एक्स्प्लोर
चला, भूत विद्येचा कोर्स करायला...! दचकलात ना, मग वाचा
हा कोर्स केलेले विद्यार्थी मानसिक उपचार न मिळणाऱ्या, त्यांना भूत बाधा मानली जाणाऱ्या भागात जाऊन रूग्णांवर उपचार करणार आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाबद्दल काही ठिकाणी आलेल्या वृत्तांकनात संभ्रम होऊ शकतो अशा बाबीही दिसतायत
वाराणसी : विद्यापीठं म्हणजे ज्ञानाची तीर्थक्षेत्रंच. त्यातही जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, बनारस हिंदू, अलिगढ मुस्लिम किंवा जामिया मिलिया ही विद्यापीठं तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय राष्ट्रीय ज्ञानसाधनेची केंद्र. त्यांचा लौकीकही तसा मोठा. मात्र, यातील बनारस हिंदू विद्यापीठ सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे, ते म्हणजे तिथं सुरू होणारा भूत विद्या कोर्स.
बनारस हिंदू विद्यापीठात आता भूत विद्येवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. पारलौकिक जीवन, आत्मा, भूतबाधा, पछाडणे, झपाटणे अशा भावनांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. अशा धारणांमुळे त्या व्यक्तीचा दैनंदिन व्यवहारही प्रभावित होतो. बुद्धीला पटणारे स्पष्टीकरण न देता आलेल्या प्रसंग, घटना, योगायोग यांना मनुष्य सहजप्रेरणेनं अनैसर्गिक किंवा अधिभौतिक ठरवतो. या प्रेरणा आजकालच्या नसून शतकानुशतके अशा विचारांचा माणसवर पगडा राहिला आहे. या स्थितींचा अभ्यास भारतीय ज्ञानशाखांमध्येही करण्यात आला आहे. अष्टांग आयुर्वेदाच्या आठ प्रमुख शाखांपैकी भूतविद्या एक आहे. याद्वारे अशा मानसिक प्रवृत्तींचा अभ्यास केला जातो. याच विद्याशाखेद्वारे लोकांच्या मानसिक आजारांवर उपचार करण्याहेतूनं हा कोर्स सुरू करत असल्याचं बनारस हिंदू विद्यापीठानं म्हटलं आहे.
प्रा. व्हि. के. द्विवेदी यांनी हा अभ्यासक्रम रचला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळानं या विषयाचा अंतर्भाव आपल्या कोर्सेसमध्ये केला आहे. ग्रामीण भारतात आजही पूर्वापार असलेल्या अंधश्रद्धांचा पगडा आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती खऱ्या उपचारांपासून वंचित राहू शकते. हा कोर्स केलेले विद्यार्थी मानसिक उपचार न मिळणाऱ्या, त्यांना भूत बाधा मानली जाणाऱ्या भागात जाऊन रूग्णांवर उपचार करणार आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाबद्दल काही ठिकाणी आलेल्या वृत्तांकनात संभ्रम होऊ शकतो अशा बाबीही दिसतायत. भूतबाधा असल्यास त्याच्या शांतीसाठी मणिमंगल विधान विधी चिकित्सा केली जाईल, असंही कळतंय. त्यामुळे गैरसमजच अधिक वाढू शकतात.
मात्र, अत्याधुनिक पद्धती, उपचार, औषधं या मार्गांनी मानसशास्त्राची ज्ञानशाखा विस्तारली जात असताना अशा अभ्यासक्रमांचे प्रयोजनच काय? असाही टीकेचा सूर व्यक्त होऊ लागलाय. लोकांची अंधश्रद्धा मिटवण्याच्या नावाखाली उलट पारलौकीक गोष्टींचं अवडंबर तर यामुळे माजणार नाही ना, असाही मुद्या उपस्थित केला जातोय.
आजीबाईच्या बटव्याचं महत्व आहेच, मात्र आधुनिक वैद्यकाची जागा तो घेऊ शकत नाही. त्यातही, मानसिक आरोग्य आणि पारलौकिक बाधा यांचा संबंध मानून उपचार करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर होण्याचीही शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement