Naxalism : तीन दशकांपासून गुंगारा देणारा जहाल नक्षलवादी अशोक रेड्डी पोलिसांच्या ताब्यात; मावोवादाचा प्रसार करण्यामागे मोठी भूमिका
Gadchiroli Naxalism : मध्यप्रदेश एटीएसने जहाल नक्षलवादी अशोक रेड्डी आणि त्याची पत्नी रहमतीला अटक केली आहे.
नागपूर: तीन दशकांपूर्वी तेलंगणामधून येऊन महाराष्ट्रात नक्षलवादाचे बी रोवणाऱ्या, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील बालाघाट क्षेत्रात नक्षलवादाची मुहूर्तमेढ करणाऱ्या जहाल नक्षल कमांडर अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ कुशनाम उर्फ महेश याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये मध्यप्रदेश एटीएसने अशोक रेड्डी आणि त्याची पत्नी रहमतीला अटक केली आहे. अशोक रेड्डीवर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाखो रुपयांचे बक्षीस होते...
अशोक रेड्डी उर्फ मुरली उर्फ महेश उर्फ कुशनाम उर्फ विनय उर्फ अशोक उर्फ श्यामलाल उर्फ बलदेव... एवढ्या टोपण नावांनी वावरणारा आणि अनेक वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा अशोक रेड्डी तेलंगणामधून महाराष्ट्रात येऊन नक्षलवादाची मुहूर्तमेढ करणारा नक्षली कमांडर. सुमारे तीन दशकांपूर्वी तेव्हा वयाच्या विशीत असलेल्या अशोक रेड्डीने फक्त गडचिरोली जिल्ह्यात माओवाद पसरवलाच नाही तर उत्तर गडचिरोली, गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट या परिसरात नक्षलवादाची संपूर्ण जबाबदारीही सांभाळली. याच अशोक रेड्डीला बुधवारी मध्यप्रदेश एटीएसने जबलपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेताना अटक केली आहे.
अशोक रेड्डीच्या विरोधात महाराष्ट्रात नक्षलवादी कारवायांचे तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्रासह शेजारच्या छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक रेड्डीला शोधणाऱ्या चारही राज्यांतील पोलिसांनी त्याच्यावर लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
अशोक रेड्डीला 2007 मध्ये नागपूरमधील दीक्षाभूमी जवळून अटक करण्यात आली होती. तेव्हा अशोक रेड्डी नक्षलवाद्यांचा जंगलातील वरिष्ठ कमांडर होता आणि तो शहरी नक्षलवादी म्हणून काम करणाऱ्या काही लोकांना भेटण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नागपुरात आल्याची पोलिसांची माहिती होती. त्याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. पण 2013 मध्ये आरोप सिद्ध न झाल्यामुळे अशोक रेड्डीची सुटका झाली.
काही दिवस विजनवासात राहिलेला अशोक रेड्डी नंतर नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या अबुजमाड परिसरात दिसून आला. गेली काही वर्षे अशोक रेड्डी सातत्याने अबुजमाडमध्ये राहून नक्षल कारवाया करत होता. तसेच त्याने तिथे नक्षलवाद्यांच्या लढ्यासाठी स्फोटकं आणि इतर शस्त्र निर्मितीचे काही अड्डे (कारखाने) तयार केल्याची पोलिसांची माहिती आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक तातडीने जबलपूरला रवाना झाले आहे.
अशोक रेड्डीला अटक होणे मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या चारही राज्यांसाठी मोठे यश आहे. त्याच्या चौकशीतून नक्षलवाद्यांचे महत्त्वाचे गुपित समोर येण्याची शक्यताही आहे. आता पुन्हा पुराव्याअभावी त्याची पुन्हा सुटका होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे.
ही बातमी वाचा: