Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला?
Kokan Refinary : भाजप हा पक्ष रिफायनरीच्या बाजूने असल्याने कोकणात रिफायनरी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे रिफायनरी आता बारसूमध्ये होणार की नाणारमध्ये हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय. अर्थात बारसू ऐवजी पुन्हा नव्यानं चर्चा झालीय ती नाणार भागाची. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी कंपन्या तयार असल्यास नाणार इथं रिफायनरी करणार अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे कोकणातील रिफायनरी नेमकी होणार कुठं? नवीन सरकारची भूमिका काय असणार? कोकणातील रिफायनरीचं भवितव्य काय राहणार? यासारख्या प्रश्नांची चर्चा पुन्हा एकदा हळूहळू होतेय.
सन 2019 मध्ये रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याला कारण आहे ते माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य. कोकणातील रिफायनरी राज्याबाहेर गेली अशा बातम्या येत असताना राणे यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. कारण थेट कंपनी आणि पेट्रोलियम मंत्र्यांशीच या मुद्यावर चर्चा करणार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.
राणेंशी आणि लोकांशी चर्चा करणार, उदय सामंतांची भूमिका
दरम्यान, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मात्र राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्प आता होणार नाही अशी भूमिका घेतलीय. त्याठिकाणी दुसरा एखादा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. या साऱ्या घडामोडींमध्ये पुन्हा एकदा उद्योगमंत्री झालेल्या उदय सामंत यांनी रिफायनरीच्या मुद्यावर नारायण राणेंशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय. त्याचवेळी त्यांनी लोकांशी चर्चा करण्याचं देखील म्हटलंय.
रिफायनरी समर्थक सक्रिय
या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडं नाणारमध्ये प्रकल्प करा अशा मागणीसाठी नाणार रिफायनरी समर्थक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील आहे. कोकणातील स्थानिक भाजप नेते देखील त्यांच्या सोबत आहेत. शिवाय, भाजप हा रिफायनरीच्या बाजूनं असलेला पक्ष आहे. त्यामुळे रिफायनरी बारसू इथं होणार की नाणार इथं याची चर्चा पुन्हा सुरू झालीय.
अर्थात या साऱ्या घडामोडी घडत असताना 2019 मध्ये रद्द झालेला नाणार इथला प्रकल्प पुन्हा आणायचा झाल्यास राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? 2019 मध्ये नाणार नेमका का रद्द झाला? त्याची कारणं काय? बारसू प्रमाणे नाणार इथं विरोध झाल्यास त्याबाबतची काय खबरदारी घेतली जाणार? महायुतीतील सर्वच घटकपक्ष रिफायनरीसाठी अनुकूल भूमिका घेणार का? विलंब झालेल्या या प्रकल्पाला नेमका जबाबदार कोण? रिफायनरी प्रकल्प खरंच राज्याबाहेर गेलाय का? महायुतीचे नेते वक्तव्य करून जनमत तर आजमवू पाहत नाही ना? यासारखे प्रश्न उपस्थित राहतात.
अर्थात, आता रिफायनरीचे समर्थन करणारे हेच नेते कधीकाही याच रिफायनरीच्या विरोधात होते. पण काळ पुढे सरकला आहे. त्यामुळे रिफायनरी करायची झाल्यास ती राजापूरमधील बारसू का नाणार इथं होणार हे पाहावं लागेल. या साऱ्यात मुख्यमंत्र्यांचा कौल देखील महत्त्वपूर्ण असणार आहे.
ही बातमी वाचा: