MSRTC Bus Running With Broken Rooftop : छत तुटलं, तरीही एसटी नाही थांबली, गडचिरोलीमधील भरधाव वेगात धावणाऱ्या एसटीचा व्हिडीओ व्हायरल
MSRTC Bus Running With Broken Rooftop Video : गडचिरोलीमध्ये महामंडळाच्या एसटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
MSRTC Bus Running With Broken Rooftop Video : गडचिरोलीमधील (Gadchiroli) लालपरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला आहे. तरी या एसटीचा (ST) चालक ही बस भरधाव वेगाने चालवत आहे. सर्वसामान्यांचं प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे, लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणं गडचिरोलीमधील प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. यामध्ये महामंडळाच्या एसटीचे छत उडाले तरी एसटी भरधाव वेगामध्ये सुसाट धावत होती. सध्या राज्यात एसटी महामंडाळाची स्थिती फार बिकट आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या या बसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्याला जोडण्याचे महत्त्वाचे काम ही लालपरी करत असते. आजही राज्यातील प्रत्येक खेड्यातील अनेक लोक या लालपरीनेच प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी ही लालपरी फार महत्त्वाची मानली जाते. पण जर तिची अशी अवस्था असेल तर यामुळे नागरिकांचा देखील जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्हिडीओवर सध्या नागरिकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.
लालपरीची बिकट अवस्था
हा व्हायरल व्हिडीओ गडचिरोली जिल्ह्यामधील आहे. या व्हिडीओमध्ये बसचे छत अर्धे तुटले आहे. तरीही या बसचा चालक ही बस वेगाने चालवत आहे. या एसटीच्या पुढे असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. पण महामंडळाच्या अनेक एसटीची अशीच अवस्था सध्या राज्यातील अनेक आगारांमध्ये असल्याचं चित्र आहे. काही एसटी बसच्या काचा फुटलेल्या आहेत, फाटलेल्या सीट आणि गंजलेला पत्रा अशा अवस्थेत सध्या ही लालपरी आहे. तरीही या लालपरीमधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता मुद्दा
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मु्द्दा उपस्थित करण्यात आला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी अशाच एका बसचा फोटो अधिवेशनात दाखवला होता. त्यावर महाराष्ट्राच्या गतिमान सरकारची जाहिरात होती. त्यावेळी त्यावर गतिमान सरकारची जाहिरात आणि बसची अवस्था या मुद्द्यावरुन अजित पवारांनी सरकारला चांगलच घेरलं होतं.
अजित पवार हे सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत. त्यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एसटी महामंडळाच्या एसटीच्या बिकट अवस्थांचा मुद्दा उपस्थित केला जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सध्या एसटीची असलेली आर्थिक अवस्था यावर देखील राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे.