Gadchiroli: गडचिरोलीतून जवळपास 138 किलो गांजा जप्त; मुंबईच्या तीन आरोपींना अटक
Gadchiroli News: छत्तीसगड राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गडचिरोलीच्या मुरुमगाव पोलिसांनी अटक केली आहे.
गडचिरोली: धानोरा तालुक्यातील मुरुमगाव जवळ गांजाची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींवर मुरुमगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा 138 किलो 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे, ते छत्तीसगड राज्यातून गांजाची तस्करी करत होते.
नेमकी कशी झाली कारवाई?
पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली. MH-04-CM-2515 या क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या होंडा सिटी कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मुरुमगाव पोलिसांना मिळाली. छत्तीसगड राज्यातून सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे ही गाडी येत होती. गाडीतील तीन जणांकडे गांजा हा मादक पदार्थ असल्याचं पोलिसांना समजलं, त्यानंतर धानोरा तालुक्यातील मुरुमगाव पोलिसांनी कटेझरीकडे जाणाऱ्या रोडसमोरील बस स्थानकासमोर सापळा लावून सदर कारला हात दाखवून थांबवलं आणि गाडीची तपासणी केली.
कारमध्ये नक्की काय काय सापडलं?
पोलिसांनी कार थांबवल्यानंतर त्या कारमध्ये पिवळ्या रंगाची चुंगळी, सिल्व्हर रंगाची चुंगळी आणि पांढऱ्या रंगाची चुंगळी असे एकूण 3 चुंगळ्यांमध्ये एकूण 138 किलो 580 ग्रॅम वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) सापडला, या गांजाची अंदाजे किंमत 13 लाख 85 हजार 800 रुपये आहे. गांजा तस्करी करताना वापरण्यात आलेली चारचाकी, सिल्व्हर रंगाची होंडा सिटी कार जवळपास 7 लाख रुपयांची आहे. तसेच, दोन आरोपींकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत 13 हजार रुपये आहे, असा एकूण किंमत 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे जमा करण्यात आला आहे.
गांजा तस्करी करणारे तीन आरोपी अटकेत
मुरुमगाव पोलिसांच्या कारवाईत गांजा तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपी हे मुंबईचे राहणारे आहेत, तिघांनाही अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावं आणि आरोपींशी संबंधित सविस्तर माहिती पाहुयात...
1) उमर फैय्याज अहमद शेख (वय 28 वर्ष) व्यवसाय - वाहन चालक, रा. कमला रमननगर, बेंगनवाडी जवळ, रजा चौक, गोवंडी, मुंबई - 43
2) राकेश राजु वरपेटी (वय 26वर्ष) व्यवसाय - मजुरी, रा. सिद्धार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुबंई - 43
3) शहबाज सरवर खान, (वय 27 वर्ष) व्यवसाय - वाहन चालक, रा. बिहॉयंन्डीग बिल्डींग नंबर-53 जवळ आचार्य कॉलेज, सुभाष नगर, चेंबुर, मुंबई - 71
जानेवारीपासून जवळपास 416 किलो गांजा जप्त
जानेवारी 2023 ते आतापर्यंत 51 लाख 91 हजार 480 रुपये किंमतीचा एकूण 416 किलो 359 ग्रॅम गांजा जप्त करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळालं आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची तस्करी केली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :