अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale Arrested in Prayagraj : बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई अखेर 6 दिवसानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बीड: बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई अखेर 6 दिवसानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्याचं (Satish Bhosale aka Khokya Bhai) लोकेशन हे प्रयागराजला सापडल्याने अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान खोक्याचं आजच ट्रांझिट रिमांड घेणार असून पुढील प्रक्रियापूर्ण करून त्याला बीडला आणलं जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी एबीपी माझाला दिली आहे.
सतीश भोसलेला बीड येथे आणलं जाईल- नवनीत कॉवत
गेल्या 6 दिवसांपासून फरार असलेला खोक्याला प्रयागराज येथेल विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खोक्या उर्फ सतीश भोसलेवर जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता. त्याचा शोध सातत्याने पोलीस घेत होते. दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराजला सापडून आलं होतं. त्यामुळे आम्ही युपी पोलीस आणि प्रयागराज येथील पोलिसांशी समन्वय साधत आज आम्ही त्याला अटक केली आहे. परिणामी आमचे पथक मार्गावर असून त्याला आज किंवा उद्या बीड येथे आणण्यात येईल. दुसऱ्या राज्यात त्याला अटक केली असल्याने त्याला ट्रांझिट रिमांडवर घ्यावे लागणार आहे. स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती बीड ते पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
पळून जाण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांच्यावरही कारवाई
दरम्यानच्या काळात, मीडियाला सतीश भोसले मुलाखत देतो, मात्र पोलिसांना सापडत नाही, अशा आशयच्या बातम्या टीव्हीवर येत होत्या. मात्र असं म्हणणं चुकीचं ठरेल. आम्ही सातत्याने त्याच्या मार्गावर होतो. पोलीस आणि मीडिया या दोन वेगळे प्रकार आहे. त्यामध्ये दोन्हीची कार्याप्रणाली वेगळी आहे. किंबहुना सतीश भोसले याला पळून जाण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असेही स्पष्टीकरण नवनीत कॉवत यांनी दिलं आहे. बीड आणि प्रयागराज पोलिसांच्या प्रयत्नांनी त्याला अटक करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा
























