Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Suresh Dhas & khokya bhai: सतीश भोसले याला उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराजमध्ये अटक केली. त्यानंतर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या कारवाईचे समर्थन केले.

मुंबई: बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले (Satish Bhosale) याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसले (Khokya Bhai) याला अटक झाल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात असलेले भाजप नेते सुरेश धस (Suresh Dhas) यांना तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सतीश भोसले याला अटक झाली, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने चूक केली आहे, त्यासंदर्भात अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटे आहेत. मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही. मी कधीही कोणत्याही पोलिसाला फोन लावत नाही. सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा, असे मी पूर्वीच म्हटले होते, असे सुरेश धस यांनी म्हटले. सतीश भोसले याच्यावर पोलिसांकडून जी काही कलमं लागली आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल, असेही धस यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंना सुरेश धस यांचे प्रत्युत्तर
पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले. पंकजा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे मी कॅमेरे घेऊन कुठे जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठी येत होते, आजही येतात. मी धनंजय मुंडेंना दवाखान्यात भेटायला गेल्याने तिकडे कॅमेरे नव्हते. कॅमेरे कुठे येणार किंवा नसणार, हे मी ठरवू शकत नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले.
पंकजा मुंडे म्हणतात की, संतोष देशमुख प्रकरण मी तापवत का ठेवलं? पण संतोष देशमुख हा भाजपचा बुथप्रमुख होता. त्याच्यासाठी मी हे प्रकरण तापवत ठेवले. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत मी हे प्रकरण तापवत ठेवणार. मी आणि भाजपने काय गांधर्व विवाह केलाय का? पंकजा मुंडे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ब्र शब्द बोलल्या नाहीत. देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेल्या नाहीत. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबतही पंकजा मुंडे बोलल्या नाहीत. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर त्या बोलल्या की उशीर झाला. त्यांना मंत्रिपदाची शपथच दिली नव्हती पाहिजे. पण मी धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर असेपर्यंत बोलत होतो, असे सुरेश धस यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी तुमच्यामुळे बळावली. तुम्ही दोघे नेते, मंत्री आणि माजी मंत्री आहात. आमच्याकडे गुंडगिरी नाही. हत्या, अवैध वाळू उपसा, राखेची अवैध वाहतूक हे सगळं बीडमध्ये चालचं. आमच्याकडे त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही, हे त्यांचं दु:ख आहे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
आणखी वाचा
सुरेश धसांनी कृष्णा आंधळेचा अंदाज वर्तवला, मात्र कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडला!























