Koradi : खसाळा राख बंधारा कोसळला, सहा गावांच्या पाण्यात वीज प्रकल्पाची राख
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळला. पावसाळ्यापूर्वीच आवश्यक असलेले फ्लाय अॅशचे नियोजन केले गेले नसल्याने ही घटना घडली असल्याची प्रशासकिय वर्तुळात चर्चा आहे.
Nagpur : राज्याच्या उपराजधानीत संततधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून शनिवारी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा कोसळून आजूबाजूची गावे फ्लाय अॅशच्या पाण्यात बुडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. खसाळा राख बंध शनिवारी सकाळी कोसळे. त्यामुळे सर्व जोड रस्ते पाण्याने भरले होते. खसाळा, म्हसळा, कवठा, खैरी आदींसह परिसरातील गावांमध्ये फ्लाय राखेचे पाणी वाहत आहे. फ्लाय ऍशच्या पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे लाखो टन राख वाहुन जात आहे. परिसरातील नदी, नाले प्रदूषित झाले आहे. सध्या दोन जेसीबीच्या मदतीने युद्धपातळीवर गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राखेच्या बंधाऱ्यात पाणी भरले होते. मात्र सकाळी 10 ते 10.30 दरम्यान कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा राख बंधारा फुटला काही वेळातच सर्वत्र राख झाली. पुरामुळे पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यात राख मिसळून परिसरातील गाव आणि शेतीमध्येही सर्वत्र राख पसरली आहे. पाणी उतरल्यावर शेतकऱ्यांना शेततीमध्ये फक्त राखच दिसणार असल्याचे चित्र आहे. तर अनेकांची पिके या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
प्रशासनाचे दुर्लक्ष
राखेमुळे प्रकल्पाच्या भोवती असणाऱ्या गावांतील समस्यांबाबत खैरी आणि खसाळा यासह इतर गावातील सरपंचांनी वेळोवेळी तोंडी आणि लिखीत स्वरुपात प्रशासनाकडे तक्रार दिली होती. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गावातील सरपंचांनी केला आहे. मात्र याचा परिणाम गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे.
नुकसान भरपाई द्या
राखेच्या बांधात पाणी भरल्यामुळे ही घटना घडली असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान फक्त सध्यापुरतेच नसून शेतीमध्ये पसरलेल्या राखेमुळे भविष्यातही शेतकऱ्यांना शेती करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती नुकसान भरपाईत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी भिलगाव येरखेडा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी केली आहे.