Plastic Ban : मनपाच्या प्लास्टिक बंदी कारवाईचा नागरिकांना मनस्ताप
मनपाच्या पथकाला एक जरी प्लास्टिक पिशवी दिसल्यास पथकातील कर्मचाऱ्यांकडून फोटो आणि व्हिडीओ काढून दंड वसूल करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहे.
नागपूर : बंदी असलेल्या प्लास्टिक वापराबद्दल नागपूर महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई सुरु आहे. दर आठवड्याला लाखोंचा दंड मनपाचे पथक प्रतिष्ठानांकडून वसूल करत आहे. मात्र अद्यापही नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या प्रकाराबाबत हवी असलेली जागृकता नसल्याने भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. मनपाच्या पथकाला एक जरी प्लास्टिक पिशवी दिसल्यास पथकातील कर्मचाऱ्यांकडून फोटो आणि व्हिडीओ काढून दंड वसूल करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहे. तरी मनपाचे पथक जनजागृती न करता थेट दंड वसूल करण्यालाच प्राधान्य देत असल्याचे दंड भरलेल्या काही प्रतिष्ठान मालकांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, हनुमाननगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि आशिनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 23 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पडोळे चौक, परसोडी येथील मोमो हट या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वर रोड येथील शिव मिष्टाण भंडार यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत महाल मार्केट येथील सेवा साडी, लक्ष्मी साडी आणि लक्ष्मी बाजार या दुकानांविरुध्द कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत लाल दरवाजा, तांडापेठ येथील माही फुड प्रोडक्ट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणि आनंद नगर, बिनाकी येथील साई आशिर्वाद स्विट या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच आशिनगर झोन अंतर्गत वैशालीनगर येथील न्यू श्री गणेश स्विट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील आर.एफ.कन्स्ट्रक्शन यांच्याविरूध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच कुकडे ले-आऊट येथील Porex Expo यांच्याविरुध्द दुकानातील कचरा आजुबाजुला पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
खालील प्लास्टिक वस्तुंवर बंदी
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि 100 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.