Rohidas Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन, खान्देशचे नेते हरपले
Rohidas Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
धुळे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील (89) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून रोहिदास पाटील हे आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (Kunal patil) यांचे वडील होते.
रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भुषवले होते. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता. धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे.
उद्या होणार अंत्यसंस्कार
रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार असून एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे अंत्यदर्शन शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात घेता येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले.… pic.twitter.com/QQiPTJETOF
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2024
दरम्यान, रोहिदास पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आणखी वाचा