Nashik Dhule News : 'तुमचं काम केलं, बक्षीस द्या, म्हणत लाच मागितली', धुळ्याचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
Nashik Dhule News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे पंचायत समितीत (Dhule Panchayat Samiti) कारवाई केली आहे.
Nashik Dhule News : नाशिकसह (Nashik) धुळे, जळगाव (Jalgaon), नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही लाचखोरीने (Bribe) ऊत आणला असून सातत्याने अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारूनही जैसे थे परिस्थिती आहे. आता एसीबीने धुळे पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून 3500 रुपयांची मागणी करणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) धडक मोहीम सुरूच असून रोजच कुठे ना कुठे कारवाई केली जात आहे. शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच हात बरबटलेले असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) धुळे पंचायत समितीत (Dhule Panchayat Samiti) कारवाई केली आहे. येथील शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे शामकांत सोनवणे रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या ठिकाणी या बीटचे विभागीय लेखापरीक्षण झाले होते. या झालेल्या लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून लाच मागितली जात होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे संपर्क साधला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे हे तक्रारदार यांच्याकडे वेळोवेळी भेटून अथवा मोबाईलवर संभाषण करून लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 3500 रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारतांना त्यांना आज रोजी रंगेहाथ पकडण्यात आले. देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाहन
नाशिक (Nashik) शहर आणि जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव आदी जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांत नाशिकच्या विविध विभागातील लाच प्रकाराने समोर येत असून यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच निदर्शनास आले आहे. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या कार्यालयात एसीबीकडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.