शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात घमासान, जयकुमार रावलांविरोधात बड्या नेत्याने ठोकला शड्डू, थोरल्या पवारांकडून तिकीट फिक्स?
Shindkheda Assembly Constituency : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत जयकुमार रावल यांच्याविरुद्ध बड्या नेत्याने शड्डू ठोकला आहे.
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार? याची उत्सुकता वाढू लागली आहे. त्यातच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून (Shindkheda Assembly Constituency) जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ सभापती हेमलता शितोळे (hemlata Shitole) या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही तासातच सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे इच्छुकांमधून धाकधूक वाढली असून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता आता वाढू लागली असतांना विविध तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
हेमलता शितोळे यांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Raval) यांचा बालेकिल्ला समजला जात असताना आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल यांच्याविरुद्ध नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि अर्थ सभापती हेमलता शितोळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेता हेमलता शितोळे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निश्चित झाल्याची देखील माहिती समोर आली असून त्यांनी देखील याबाबत आपल्यालाच पक्षाकडून उमेदवारी मिळेल, असा दावा केला आहे. जयकुमार रावल यांच्या विरोधात हेमलता शितोळे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होते का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
पक्षाने संधी दिल्यास बदल घडवून आणणार : हेमलता शितोळे
दरम्यान, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव तसेच मतदारसंघातील प्रश्नांची आपल्याला पूर्णतः जाणीव असून पक्षाने संधी दिल्यास नक्कीच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात बदल घडवून आणू असा विश्वास देखील हेमलता शितोळे यांनी व्यक्त केला आहे. आता हेमलता शिरोळे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा