ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना स्पष्ट निर्देश
Dharashiv Flood Farmers: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, असे स्पष्ट निर्देश देत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहे.

ABP Majha Impact : धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतजमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान, घरांची पडझड आणि जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई आहे. दरम्यान अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दरम्यान, एकीकडे शेतकरी (Farmer) मोठ्या संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून (Bank) आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा प्रकार समोर आला होता. धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील संचितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी SBI बँकेने नोटीसा (Notice) पाठवलेल्या आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्याघडीला आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याच्या संतापजनक प्रकार समोर आला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर एबीपी माझाने बातमी (ABP Majha Impact) दाखवल्यानंतर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देत जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा सर्व बँकांना स्पष्ट निर्देश (District Collector Kirti Kiran Pujara Instructions to Banks)
अतिवृष्टी आणि पावसामुळे शेतीचा मोठा भाग वाहून गेलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यातच बँकांकडून वसुली सुरूच असल्याचे दिसून येत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी धाराशिव मधील शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या चिंतेला दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार जिल्हा अग्रणी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकामार्फत सर्व बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, सद्यःस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर असलेला होल्ड तातडीने हटवून शासनाकडून मिळणारे अनुदान व मदत रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा (ABP Majha Impact on Dharashiv Flood Farmers)
अलीकडे काही शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस मिळाल्या होत्या. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,या नोटीस नव्या नसून लोक अदालत, पीक कर्ज नव्याने करणे किंवा तडजोडीच्या संदर्भातील जुन्या नोटीस आहेत.मात्र मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत कुठल्याही नवीन नोटीसा देऊ नयेत,अशा कडक सूचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाकडुन सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये,असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून,कर्ज वसुलीची भीती बाजूला ठेवून आता कुटुंब आणि शेती पुन्हा उभे करण्यासाठी काम करता येईल,अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
























