Ajit Pawar : मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही, कोणत्या कॉंग्रेस आमदाराबद्दल पवारांनी बोलणे टाळले?
बॅनरबाजीवर बोलताना पवार यांनी 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' असे सांगितले. या राज्यातील जनतेच्या मूळ समस्या सुटल्या पाहिजेत याकडे तुम्ही व आम्ही लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चंद्रपूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी पक्षाकडून कुठलेही बॅनर लावण्यात आले नाही. मात्र कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यावतीने मोठे बॅनर लावण्यात आले होते. मात्र या बाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता, 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' असे मत पवारांनी व्यक्त केले. या राज्यातील जनतेच्या मूळ समस्या सुटल्या पाहिजेत याकडे तुम्ही व आम्ही लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. मात्र धानोरकर दांपत्याच्या बॅनरबाजीवर बोलणे पवारांनी टाळले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
धानोरकरांच्या कार्यालयाला भेट
गेल्या महिनाभरापासून पाऊस विदर्भाला झोडपतो आहे. या पावसाने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयात भेट दिली.
दाम्पत्याच्या सूचना पवार शासन दरबारी मांडणार
यावेळी धानोरकर दाम्पत्याने जिल्ह्यातील पूर परिस्थितीची इत्थंभूत माहिती अजित दादांना दिली. या अतिवृष्टीने झालेले नुकसान, त्याचे होणारे दूरगामी परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना यावर या नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. खासदार व आमदार धानोरकर यांनी केलेल्या सूचना शासन दरबारी मांडून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी 75 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मोठी मागणी शासनाकडे मांडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
ओला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडू
याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्याचीही पाहणी केली. धानोरकर दाम्पत्यांनी पूर परिस्थितीवर केलेल्या सूचना तात्काळ शासन दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पडू, असे अजित पवार यावेळी म्हणाले.