Talathi Bharti Exam 2023 : तलाठी परीक्षेत नियोजनाचा अभाव औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र
Talathi Bharti Exam 2023 : विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, केंद्र बदलून देण्याची मागणी होत आहे.
Talathi Bharti Exam 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा (Talathi Bharti Exam) तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्र ऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचे दिसत आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि नांदेडच्या (Nanded) विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, केंद्र बदलून देण्याची मागणी होत आहे.
राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. मात्र, जादा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याने आधीच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला होता. सोबतच, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याची यंत्रणा संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचाही आरोप होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. तलाठी भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र पहिल्याच टप्प्यात परीक्षार्थीचे परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्याने गोंधळ उडाला आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्रच दिले गेले नाही. औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र् देण्यात आले आहे. त्यामुळे हे केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संताप....
तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज भरतांना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. त्यामुळे अनेकांनी आपापल्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र निवडली होती. मात्र, आता हॉल तिकीटवर औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना थेट नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात परीक्षा केंद्र् देण्यात आली आहे. औरंगाबाद ते नागपूर तब्बल 450 किलोमीटरचे अंतर आहे. तर अमरावती देखील औरंगाबाद पासून 313 किलोमीटर आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांवर जाण्यायेण्याचा खर्चाचा बोझा पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
गैरप्रकार होण्याची शक्यता?
राज्यभरात होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय संमतीने केला आहे. तर, काही विध्यार्थ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे. "महाराष्ट्रात नोकरभरती घोटाळे सुरू असून, वन विभाग, मुंबई पोलीस भरती ई. पेपर फुटलेले आहेत. तलाठीची परीक्षा समोरच असून, पेपरफोड्या थांबविण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर पेपरफुटी कायदा करावा व परीक्षेचे शुल्क कमी करण्याची मागणी,” सरकार दरबारी मांडण्याची मागणी यावेळी विध्यार्थ्यांनी पटोले यांच्याकडे केली.
इतर महत्वाच्या बातम्या: