Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज शिर्डी, छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, दोन जाहीर सभा घेणार, कुणावर तोफ डागणार?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज शिर्डी, छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आज दोन जाहीर सभा होणार असून यातून उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रभरात दौरेदेखील सुरु झाले आहेत. मागील महिन्यात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) दौरा केला होता. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज शिर्डी (Shirdi), छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दोन जाहीर सभा होणार असून यातून ते कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला रवाना होणार आहेत. 11 वाजता शिर्डी संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजून १५ मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठ्कारेंची सभा होणार आहे. यावेळी भाजपचे काही मोठे नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
सचिन घायाळ ठाकरे गटात प्रवेश करणार
त्यानंतर दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ते वैजापूरहून पैठणला रवाना होणार आहेत. सव्वाचार वाजता त्यांचे पैठण येथे आगमन होणार आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरेंची दुसरी सभा होईल. सोबतच संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ ठाकरे गटात प्रवेश करतील. सायंकाळी साडेपाच वाजता ते पैठणहून चिकलठाणा विमानतळाकडे रवाना होणार आहेत. साडेसहा वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार असून, नंतर ते खासगी विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.
उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा दौरा होत असल्याने, ठाकरे आज कुणावर निशाणा साधतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. उद्धव ठाकरे दौरा करत असलेल्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेत बंडखोर झाली होती. ज्यात पैठण मतदारसंघात संदिपान भुमरे तर वैजापूर मतदारसंघात रमेश बोरणारे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. आता उद्धव ठाकरे पैठण आणि वैजापुरात येत असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
आणखी वाचा
विदर्भात मविआचं ठरलं! 62 विधानसभांपैकी 29 जागांचं गणित सुटलं, 'या' मतदारसंघांवर एकाच पक्षाचा दावा