Sambhaji Bhide : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही भिडे गुरुजींचा कार्यक्रम; आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल
Sambhaji Bhide in Aurangabad : पोलिसांनी या प्रकरणी एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश राजेद्र शहाने (रा गंगापुर, औरंगाबाद), गोविद अशोक जाधव (रा. सिध्दपुर,ता गंगापुर जि. औरंगाबाद), मोहित अशोकराव कुलकर्णी (रा. पाटील कॉलनी गंगापुर जि. औरंगाबाद), आकाश सपत जाधव (रा. सिध्दपुर ता गंगापुर, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत.
संभाजी भिडे यांचा 20 जुलै रोजी गंगापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गंगापूर शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गंगापुर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा हेतू आहे. त्यामुळे शहारातील व तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन पोलिसांना काही संघटनांनी दिले होते. तसेच हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. मात्र तरीही भिडे यांचा कार्यक्रम झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यामुळे पोलिसांनी केला गुन्हा दाखल...
या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. ज्यात पोलिसांनी म्हटले आहे की, "गंगापुर येथे 20 जुलै रोजी राधाकृष्ण मंगलकार्यालयामध्ये सभाजी भिडे होणारा कार्यक्रम रदद करण्याबाबत नोटीस व लेखी पत्र देवुन सुध्दा विनापरवानगी काय्रक्रमाचे आयोजन करून बेकायदेशीर जमाव जमवण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मुबई पोलीस अधिनियम 37 '1' व 373 अन्वये लागु केलेल्या आदेशाचे उलंघन व कलम 149 सीआरपीसी प्रमाणे दिलेल्या नोटीसा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात येत" आहे.
कार्यक्रमाला झाला होता विरोध....
संभाजी भिडे यांचा कार्यक्रम गंगापूरमध्ये आयोजित करण्यात आल्याने त्याला मोठा विरोध झाला होता. भिडे शहरात दाखल होताच त्यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी मोठ्याप्रमाणात आंबेडकर अनुयायींची गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र पोलिसांनी त्यांना अडवत ताब्यात घेतले होते. त्यामुळे मोठा वाद टळला होता.
इतर महत्वाच्या बातम्या: