(Source: Matrize)
दुष्काळाची चाहूल! मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात केवळ 42 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईच्या संकटाची भीती
Marathwada Water Storage Update : चिंताजनक म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 33.18 टक्के पाणीसाठा राहिला आहे.
Marathwada Water Storage Update : जून महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली, तर जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. त्यात आता ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा देखील संपला आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याचे प्रकल्प आता कोरडे पडू लागले आहे. तर काही ठिकाणी धरणात अल्प पाणीसाठा (Water Storage) शिल्लक असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील आता परिस्थिती चिंता वाध्वन्री ठरत आहे. कारण विभागातील 11 मोठ्या धरणात फक्त 42 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आता फक्त दोन महिने पावसाळा शिल्लक राहिला आहे. चिंताजनक म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात फक्त 33.18 टक्के पाणीसाठा राहिला आहे.
मराठवाड्यातील मोठ्या 11 धरणाची परिस्थिती...
अ.क्र. | धरणाचे नाव | पाणीसाठा |
1 | जायकवाडी | 33.18 टक्के |
2 | विष्णुपुरी | 79.18 टक्के |
3 | एलदरी | 59.97 टक्के |
4 | सिद्धेश्वर | 43.93 टक्के |
5 | निम्न दुधना | 27.25 टक्के |
6 | माजलगाव | 16.3 टक्के |
7 | मांजरा | 26.85 टक्के |
8 | निम्न तेरणा | 30.28 टक्के |
9 | सीना कोळगाव | 0 टक्के |
10 | पेनगंगा | 63.16 टक्के |
11 | मनार | 51.5 टक्के |
एकूण | 42.20 टक्के |
पिकं मान टाकू लागले...
जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर मागील सात दिवसांत किंचित भाग सोडल्यास मराठवाड्यात चांगला पाऊसच झाला नाही. काही ठिकाणी तर मागील सात दिवसांत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी तर पिकांनी अक्षरशः माना टाकू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आधीच सव्वादोन महिने पावसाचे संपले असल्याने दुबार पेरणी करूनही काही हातात येईल याची देखील अपेक्षा कमीच आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
मराठवाड्यातील पावसाची स्थिती
अ.क्र. | जिल्हा | गतवर्षी पाऊस | यावर्षीचा आतापर्यंत पाऊस |
1 | औरंगाबाद | 403 मिमी | 247 मिमी |
2 | जालना | 492.8 मिमी | 253.7 मिमी |
3 | बीड | 396.1 मिमी | 241.6 मिमी |
4 | लातूर | 498 मिमी | 317.6 मिमी |
5 | उस्मानाबाद | 419.9 मिमी | 269.9 मिमी |
6 | नांदेड | 802.9 मिमी | 580.6 मिमी |
7 | परभणी | 469.4 मिमी | 273.7 मिमी |
8 | हिंगोली | 637.7 | 430.8 मिमी |
मराठवाडा विभागात 78 टँकर सुरु
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात सध्या 55 गाव आणि 22 वाड्यावर 78 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सात शासकीय आणि 71 खाजगी टँकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 28 गाव आणि 4 वाड्यांवर एकूण 35 टँकर सुरु आहेत. जालना जिल्ह्यात 27 गावं आणि 18 वाड्यांवर एकूण 36 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
चिंता वाढली! गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 90 टक्के पाणीसाठा असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 32 टक्के पाणी