Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
Voting Percentage in Satara : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यामध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. सातारा, कराड उत्तर, पाटण, कराड दक्षिण, वाई, फलटण, कोरेगाव, माण या मतदारसंघांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात प्रमुख लढत महाविकास आघाडी आणि महायुती अशी आहे. सायंकाळी 5 वाजे पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यात साधारणपणे 64.16 टक्के मतदान झालं आहे. मतदारसंघांचा विचार केला असता सर्वाधिक मतदान कराड दक्षिण मतदारसंघात झालं आहे. तर, सातारा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आहे.
सातारा जिल्ह्यातील दुपारी 5 पर्यंतची सविस्तर टक्केवारी
फलटण मतदारसंघ - 63.1%
वाई मतदारसंघ - 61.29%
कोरेगाव मतदारसंघ - 69.61%
माण मतादारसंघ - 60.69%
कराड उत्तर मतदारसंघ -67.23%
कराड दक्षिण मतदारसंघ- 67.91%
पाटण मतदारसंघ - 66.39%
सातारा विधानसभा -58.55%
साताऱ्यात महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात?
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 5 जागा लढवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 2 तर काँग्रेसनं एका जागेवर उमेदवार दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, वाईमध्ये अरुणादेवी पिसाळ, फलटणला दीपक चव्हाण, कोरेगावला शशिकांत शिंदे आणि माण मतदारसंघात प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी दिली आहे. कराड दक्षिणमध्ये काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून साताऱ्यात अमित कदम आणि पाटण मतदारसंघातून हर्षद कदम रिंगणात आहेत. तर, पाटणमध्ये सत्यजीतसिंह पाटणकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुतीकडून कोण रिंगणात?
महायुतीच्या जागा वाटपात भाजपनं साताऱ्यात सर्वाधिक जागा लढवल्या आहेत. भाजपला चार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले, कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, माणमध्ये जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाईमध्ये मकरंद पाटील, फलटणमध्ये सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि कोरेगावमध्ये महेश शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
चुरशीच्या लढतींचा अंदाज
सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 55 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यानं इथल्या लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी पाहता, कराड उत्तर, पाटण, कराड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे. याशिवाय कोरेगावमध्ये देखील जोरदार लढत होत आहे.
इतर बातम्या :