Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Kolhapur District Assembly Constituency : मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी अनेक मतदान केंद्रांवर अजूनही रांगा कायम आहेत. त्यामुळे अंतिम आकडेवारीमध्ये मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यंत चुरशीने 67.97 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामुळे एकूण आकडेवारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान 80 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या आणि राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या आणि कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 74.33 टक्के मतदानाची नोंद झाली असून या ठिकाणी सुद्धा मतदानाचा सर्वोच्च आकडा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी अनेक मतदान केंद्रांवर अजूनही रांगा कायम आहेत. त्यामुळे अंतिम आकडेवारीमध्ये मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कागलमध्ये आणि कोल्हापूर उत्तरमधील किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्स्फूर्त आणि शांततेत मतदान पार पडलं आहे.
राधानगरी आणि करवीरमध्ये जोरदार चुरस
दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्येही मोठी चुरस असून त्या ठिकाणी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत 72.83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राधानगरीमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्यामध्ये फाईट होत आहे. करवीर विधानसभेला चुरशीने मतदान झालं असून 72.18 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. करवीरला काँग्रेसचे राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके रिंगणामध्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजूनही 60 टक्क्यांच्या खाली मतदान आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता उर्वरित आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 65 टक्क्यांवर मतदान पार पडलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण मतदानाचा आकडा हा 80 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. इचलकरंजीमध्ये सर्वाधिक कमी मतदान झालं असून 57.83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये इचलकरंजीमध्ये मतदानाचा टक्का किती वाढतो याकडे लक्ष असेल.
हातकणंगले मतदारसंघामध्ये मताची टक्केवारी सुधारली
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदार संघामध्ये सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये मतदानाचा आकडा वाढला असून कोल्हापूर दक्षिणमध्ये 68.72 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शाहूवाडीमध्ये 70.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. चंदगडमध्ये 68.58 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शिरोळमध्ये 68.49 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. हातकणंगले मतदारसंघामध्ये सुद्धा मताची टक्केवारी सुधारली असून पाच वाजेपर्यंत 65.10 टक्के मतदान झालं आहे.
जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर उत्साहात मतदानाला लोक बाहेर पडल्याचे दिसून आले. मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यामध्ये नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृत्तीयपंथी मतदारांनी उत्साहात मतदान केले. अनेक ठिकाणी मतदारांना बाहेर काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विशेष यंत्रणा राबविण्यात येत होती. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने कोणताही अंदाज लावणे अशक्यप्राय होऊन गेलं आहे. त्यामुळे गुलाल कोणाला लागणार याचे उत्तर शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मिळणार आहे. मात्र, झालेल्या मतदानाच्या आकडेवारीने आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान
- कागल –74.33 टक्के
- राधानगरी –72.83 टक्के
- करवीर – 72.18 टक्के
- शाहूवाडी – 70.40 टक्के
- कोल्हापूर दक्षिण – 68.72 टक्के
- चंदगड – 68.58 टक्के
- शिरोळ – 68.49 टक्के
- हातकणगंले – 65.10 टक्के
- कोल्हापूर उत्तर – 59.76 टक्के
- इचलकरंजी – 57.83 टक्के
इतर महत्वाच्या बातम्या