Marathwada Cabinet Meeting : फडणवीसांच्या 'त्या' घोषणांचं काय झालं? अंबादास दानवेंनी यादीच वाचून दाखवली
Ambadas Danve : तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणांचं काय झालं?: अंबादास दानवे
औरंगाबाद : उद्या औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच फडणवीस यांनी त्यावेळी केलेल्या घोषणा ज्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, अशा कामांची यादीच दानवे यांनी वाचून दाखवली आहे.
2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 41 हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत, त्यांनी इतर अवास्तव घोषणा केल्यापेक्षा स्वतः घोषणा केलेले कामे पूर्ण करावे, असे दानवे म्हणाले.
अंबादास दानवेंकडून जाहीर करण्यात आलेली यादी....
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
- धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे.
- सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
- नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित केलेले सुमारे 250 कोटी कुठे आहेत?
- लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते, त्याचं काय झालं?
- मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात, त्याचे काय झाले?
- औरंगाबादच्या करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात.
- परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? त्याचं काय झालं?
- मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना संतगतीने सुरु आहे.
- कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी देणार होतात? त्याचे काय झालं?
- सिंचन प्रकल्पांसाठी 1048 कोटी देणार होतात.
- नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2826 कोटींची कबुली होती.
- विमानतळ विस्तारीकरणासाठी 200 कोटीची घोषणा केली होती.
- औरंगाबाद पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटीची घोषणा केली होती.
- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला 279 कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त 12 कोटी
- 25 हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी 375 कोटींची कबुली होती.
- जालन्यात सीड पार्क साठी 109 कोटींचा वायदा होता.
दरम्यान यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, "तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत. यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा औरंगाबादेत येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल 32 देश घेत असतात, असं म्हणतात.. तुमच्या दिल्लीश्वर पातशहा सवय आहे शब्द फिरवायची आणि विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची राजस्थानच्या अजमेरमध्ये भर पावसात दणदणीत सभा