(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले, आता पुढे काय?
Maratha Reservation : पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणानंतर मराठवाड्यातील (Marathwada) कुणबी मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबतीत सर्वच संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कुणबी मराठा समाजाच्या नोंदी निजामकालीन असल्याची माहिती घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक13 सप्टेंबर) रोजी हैदराबादला (Hyderabad) रवाना झाले होते. मात्र, या दौऱ्यातून खूप काही हाती लागले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर, जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी सरकारने निजामकालीन दस्तऐवज शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला पाठविले होते. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचे एक पथक तयार करण्यात आले होते. ज्यात, 1967 पूर्वीच्या निजामकालीन 'कुणबी' अशा नोंदी असलेली माहिती घेण्यासाठी विभागीय अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्या नेतृत्वात हे पथक 13 सप्टेंबर रोजी हैदराबादला गेले होते. या पथकाने हैदराबादमध्ये जुन्या रेकॉर्डची पाहणी केली. पथकाचा अंतिम अहवाल अद्याप आला नाही, परंतु खूप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पथकाच्या दौऱ्यात नेमकं काय झालं?
- यावेळी पथकाने सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासले असून त्यातून ठोस काही सापडले नाही.
- 1931 पूर्वीची जनगणनेची घरयादी मिळाली नाही. मात्र, ती यादीच महत्त्वाची होती.
- जे दस्तऐवज सापडले ते आणले असून, त्यातील काही रेकॉर्ड फारशीमध्ये आहे.
- या दस्तऐवजांचा मजकूर समजण्यासाठी गुगल ट्रान्सलेशन वापरले. मात्र, ते तंतोतंत जुळत नाही. परंतु त्या दस्तऐवजामध्ये कुणबीचा संदर्भ आढळला नाही.
- एकूण सनदची ( मुन्तकब) संख्या 1200 च्या आसपास आहे. त्यातील 1 हजार सनद राज्यातील असतील. त्यात मुस्लिमांना जास्त सनद दिल्याचे आढळले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! कुणबी नोंदी शोधण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक हैदराबादला जाणार