छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा मनोज जरांगेंचा फोटो असलेला बॅनर फाडला; घटनास्थळी पोलीस दाखल
Manoj Jarange : छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथे लावण्यात आलेला मनोज जरांगे पाटील यांचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडला असल्याचे समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर फाडण्यात आल्याची घटना चार दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, आता याच भागात पुन्हा एकदा मनोज जरांगेंचा फोटो असलेला बॅनर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेवरून मराठा समाज बांधव आक्रमक झाला असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या लासुर स्टेशन येथे लावण्यात आलेला मनोज जरांगे पाटील यांचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडला असल्याचे समोर येत आहे. लासुर स्टेशन शिवारातील लासुर स्टेशन ते डोणगाव रोडवरील बाभुळगाव रोडवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला गावबंदीचे बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर, घटनास्थळी शिल्लेगाव पोलिस दाखल झाले आहेत. तर, हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच परिसरातील मराठा बांधव देखील घटनास्थळी दाखल होतांना पाहायला मिळत आहे.
यापूर्वी देखील फाडला होता बॅनर...
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडण्याची ही दुसरी घटना असून, यापूर्वी देखील अशाचप्रकारे बॅनर फाडण्यात आले होते. गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर चार दिवसांपूर्वी फाडण्यात आले होते. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला होता. त्यामुळे खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.
पोलिसांची डोकेदुखी वाढणार...
मनोज जरांगेंचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असतांना त्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे, राज्यभरात गावागावात गावबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, आता सरकारला जरांगे यांनी पुन्हा एकदा 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे गावबंदी देखील उठवण्यात आली असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. परंतु, गावात लावण्यात आलेले बॅनर अजूनही तसेच आहे. दरम्यान, आता हेच बॅनर फाडण्याच्या घटना समोर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मनोज जरांगेंचा बॅनर फाडला, पोलिसांत गुन्हा दाखल; 'एफआयआर'मध्ये छगन भुजबळांचं नाव