'झिंग... झिंग... झिंगाट...' झिंगाट गाण्यावर थिरकल्या जी-20 परदेशी पाहुण्या; पाहा व्हिडीओ
G-20 Conference: विदेशी महिला पाहुण्यांना झिंग-झिंग झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही
Chhatrapati Sambhajinagar: G-20 परिषदेच्या (G-20 Conference) निमित्ताने देश विदेशातील अनेक पाहुणे सद्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या या विदेशी पाहुण्यांसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान विविध देशांच्या महिला सदस्यांनी सोमवारची रात्र मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील हॉटेल ताजच्या हिरवळीवर आयोजित रात्रीच्या भोजन व संगीत कार्यक्रमात अनेक विदेशी महिला पाहुण्यांना झिंग-झिंग झिंगाट गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी ठेका धरला. त्यासोबतच काहींनी नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचा ठेका धरत आनंद साजरा केला.
G-20 परिषदेच्या अंतर्गत वुमन-20 सदस्यांची छत्रपती संभाजीनगर शहरात बैठक होत आहे. यासाठी देशातील निवडक महत्वाच्या शहरांमध्ये या परिषदेच्या विविध विषयांवर बैठका होता आहे. दरम्यान या पाहुण्यांसाठी शहरातील हॉटेल ताजमध्ये रात्रीच्या भोजनासह संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात एका पथकाने नाशिक ढोलच्या तालावर लेझीमचे नृत्य सादर केले आणि ते पाहून परदेशी पाहुण्यांनाही मोह आवरता आला नाही. त्या देखील लेझीम घेऊन खेळल्या. दरम्यान यावेळी झिंग झिंग झिंगाट गाणे लागताच विदेशी पाहुण्यांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी स्टेजचा ताबा घेतला आणि सर्वांनी झिंगाटवर ठेका धरला. अनेकांनी हा सर्व जल्लोष आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
वेरुळ लेण्यांच्या कलेचे जी-20 शिष्टमंडळाकडून कौतुक
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी येथे जी-20 च्या W-20 शिष्टमंडळाने भेट दिली. लेण्यांची पाहणी करत कैलास मंदिर आणि कोरलेल्या विविध लेण्या, कलाकुसर आदींचे कौतुकही शिष्टमंडळाने केले. तसेच वेरुळ लेण्या पाहून शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या शिष्टमंडळाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पाहणी दरम्यान विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भाषेत वेरूळ लेणीबाबत सविस्तर माहिती गाईड यांनी दिली. माहिती ऐकून आणि कलेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तत्कालीन कलाकृती निर्मितीबद्दल आश्चर्यही शिष्टमंडळाने व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.
मकबरा पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले!
दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधींनी मंगळवारी (28 फेब्रुवारी) रोजी बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मकबरा आणि परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. तर इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले होते.
पाहा व्हिडिओ!
इतर महत्वाच्या बातम्या:
G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये वुमन-20 बैठकीला सुरुवात; लैंगिक डिजिटल तफावतवर चर्चा