Congress March : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर, छ. संभाजीनगरमध्ये निघाला भव्य मोर्चा
Congress March: या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते.
Congress March: शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) आज रस्त्यावर उतरत आक्रोश मोर्चा काढला. काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा आक्रोश मोर्चा फुलंब्री तहसीलवर काढण्यात आला होता. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं कापूस घरात पडून आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही, शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदानही अजून मिळाले नाही, पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, या सर्व मागण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते. तर बैलगाडीसह शेतकरी आंदोलनात उतरले होते.
यावेळी काढण्यात आलेल्या मोर्च्यात, शासनाने विविध मदतीच्या घोषणा केल्या, परंतु त्याचा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. शेतकरी कसातरी तग धरून उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे तर, त्यामध्ये शेतकऱ्यांना रात्री अपरात्री विद्युत पुरवठा दिला जात आहे. वीजबील भरण्याची त्याची सध्याची परिस्थिती नसताना विद्युत पुरवठा बंद करण्यात येत आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडले असून, यांत्रिकी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे इंधनाचेदेखील भाव वाढलेले आहे. एकीकडे उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नाही आणि महागाईने शेतकरी संकटात सापडला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या आहेत मागण्या!
- मोठे काबडकष्ट करून पिकवलेल्या कापसाला प्रति क्विंटल रू. 15000/- तर कांद्याला प्रतिक्विंटल रू. 4000/- भाव देण्यांत यावा.
- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतांना देखील पिकविमा देण्यांत विलंब झाला असून तो तातडीने देण्यात यावा.
- अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने अनुदान घोषित केले होते. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नसून, ते तातडीने देण्यांत यावे.
- नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रू. 50 हजाराचे अनुदान घोषित केले होते. परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसून, ते तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे.
- शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असतांना शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद करून, हातातोंडाशी आलेला घास हिसकावण्यात आला आहे. करिता विद्युत पुरवठा बंद करण्यांत येऊ नये व दिवसा विद्युत पुरवठा देण्यांत यावा.
- एकाबाजुला शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही आणि रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल यांचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. तरी पेट्रोल / डिझेल व रासायनिक खताचे भाव कमी करण्यांत यावे.
- घरगुती गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्याचे बजट कोलमडत आहे. तरी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव त्वरीत कमी करण्यांत यावे.
- शेतकऱ्यांसाठी उभारलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना, फुलंब्री शासनाने चालु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व कर्मचारी / कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे.
- महिलांच्या सबलीकरणासाठी महिला बचत गटाच्या महिलांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. अशा अनेक मागण्यासाठी आज फुलंब्री विधानसभा कॅांग्रेस कमिटीच्या वतिने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.