Chhatrapati Sambhaji Nagar: तब्बल 17 गुन्हे दाखल असूनही पोलिसांना सापडत नव्हता, पण एक चूक केली अन् अडकला
Chhatrapati Sambhaji Nagar : या आरोपीला एका महत्त्वाच्या गुन्ह्यात पोलीस गेल्या काही दिवसांपासून सतत शोधत होते.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhaji Nagar City) पोलिसांनी मोठी कारवाई करत एका अट्टल गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या डायल 112 बिट मार्शल पोलीसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर 17 गुन्हे दाखल असून, त्याला एका महत्त्वाच्या गुन्ह्यात पोलीस गेल्या काही दिवसांपासून सतत शोधत होते. शेख अली शेख सत्तार (वय 25 वर्ष रा. इंदीरानगर गारखेडा छ. संभाजीनगर) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीम अलीम शहा (वय 21 वर्ष, रा. इंदिरानगर गारखेडा छ. संभाजीनगर) यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली होती. ज्यानुसार त्यांचे पती ड्रायव्हिंगसाठी गाडीवर बाहेर गावी गेले होते. तर तस्लीम या घरी एकट्याच असल्याने जवळच राहणारे आई- वडिलाकडे रात्री त्या झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे दाराला कुलूप लावून गेल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचे पती परत घरी आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. दाराचा कोंडा तुटलेला दिसला.
घरात जावून पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व पैसे पाहिले असता कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे 04 ग्राम वजनाचे 'कुलूप कडी कानातले, व मंगळसुत्र 22 हजार रुपये किमतीचे व चांदीचे पायातील जोडवे, पैंजन 3 हजार रुपये किमतीचे, विवो कंपनीचा हॅन्डसेट मोबाईल 5 हजार रुपये किंमतीचा, रोख 10 हजार रुपये असे कपाटाचे लॉक तोडून चोरुन नेले होते.
रुग्णालयात आला अन् अडकला...
दरम्यान याच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी यापुर्वी आरोपी शेख मजहर शेख गुलाब (वय 24 रा. इंदिरानगर गारखेडा छ. संभाजीनगर) यास अटक केली होती. त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला होता. मात्र चोरी करताना त्याचा साथीदार असलेला शेख अली फरार होता. दरम्यान 7 मे रोजी तो शिवाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात आली आला होता. पण याची माहिती खबऱ्याने डायल 112 बिट मार्शल पोह चंद्रकांत पोटे, पोअं मारोती गोरे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी याची महिती वरिष्ठांना दिली आणि त्यानुसार अलीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: