इन्स्टाग्रामवर लायटर पिस्तुल घेऊन व्हिडीओ बनवणे पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधील एकाला इन्स्टाग्रामवर (Instagram) लायटर पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणे पडलं महागात पडले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : सध्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याची मोठी क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात अॅक्शन व्हिडीओवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे चित्रपटामधील डायलॉगवर हातात शस्त्र घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एकाला इन्स्टाग्रामवर (Instagram) लायटर पिस्तुल घेऊन व्हिडीओ बनवणे पडलं महागात पडले आहे. कारण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. करण बाबासाहेब पगारे (वय 19 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. ज्यात एक तरुण हातात बंदूकसारखे शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवूर पोलीस ठाण्याचे प्रमुख संदीप पाटील यांना याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी याबाबत तात्काळ पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना माहिती दिली. तर संबधित तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी दिले.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सुचनेनुसार संदीप पाटील यांनी तरुणाचा शोध घेण्यासाठी तात्काळ एका पथकाची नियुक्ती केली. ज्यात नागटिळक, विशाल पैठणकर, तायडे मेजर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान या पथकाने तरुणाचा सर्वत्र शोध मिळालेल्या माहितीनुसार अखेर त्याला ताब्यात घेतले. तसेच संबधित व्हिडीओ आणि बंदूकसारखे दिसणाऱ्या शस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने ते लायटर पिस्तुल असल्याची माहिती दिली. तर त्याच्या ताब्यातून अशा दोन लायटर पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती शिवूर पोलीस ठाण्याचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे. तसेच कोणीही सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चिथावणी देणारे व्हिडीओ तयार करुन व्हायरल करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा संदीप पाटील यांनी दिला आहे.
पोलिसांची 'सोशल पेट्रोलिंग'...
छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या मुद्यावरुन सुरु असलेला वाद आणि गेल्या आठवड्यात दोन गटात झालेल्या वादानंतर पोलिसांकडून सोशल मीडियावर विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या शहर आणि ग्रामीण पोलिसांचे सायबर पथक सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्ट आणि घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच कोणत्याही व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घेतली पाहिजे अन्यथा तुम्हाला देखील कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या :
वाहन पकडल्यावर होणारे वाद टाळण्यासाठी 'हे' करा; वाहतूक पोलिसांनी सुचवले पर्याय