Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तलवारी पकडल्या, गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji Nagar : देवगाव रंगारी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दोन गटातील वादानंतर पोलीस शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन तलवारी (Sword) जप्त केल्या आहेत. देवगाव रंगारी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी नितीन बाळू पोपळघट (रा देवगाव रंगारी ता.कन्नड), जगदिश सिंग बमणावत (देवगाव रंगारी) , गजानन रोहीदास गायकवाड (वय 25 वर्ष रा मिलवाडा देवगाव रंगारी ता कन्नड), अरबाज आयुब शेख (रा. देवगाव रंगारी), राहुल भाऊसाहेब नांगर्ड (रा. कानडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल एस. मोरे पोलीस स्टाफसह आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, देवगाव रंगारी गावातील नितीन बाळू पोपळघट हा तलवार बाळगून चोरटी विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. खात्रीलायक बातमी मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनी आपल्या पथकासह नितीन पोपळघटच्या घरी छापा मारला. दरम्यान पोपळघटची चौकशी केली असता त्याने, गावातील जगदिश बमणावत, गजानन गायकवाड, अरबाज अय्युब शेख यांना तलवारी विकल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी वरील लोकांच्या घरी छापे टाकले.
शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल
पोलिसांनी केलेल्या छापेमारीत जगदिश बमणावत याच्याकडे एक लोखंडी तलवार, गजानन गायकवाडकडे एक लोखंडी तलवार व राहुल भाऊसाहेब नांगर्डे याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही तलवारी दोन पंचासमक्ष जप्त केल्या. तर पोलिसांनी वरील सर्व आरोपींच्या विरोधात शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. तर त्यांच्या ताब्यातून तीन तलवारी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. तर ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउपनि खांडखळे, सफौ. एस आर राठोड, पोहकोळी, पोका.पैठणकर,जारवाल, चापोको. रोडगे यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन...
सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याने, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. ज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस, मेसेजेस्, तयार करून ते पोस्ट, लाईक, शेअर, कमेट्स, फॉरवर्ड, करून इतरत्र प्रसारित करण्यासारखे कृत्य केल्यास संबधित व्यक्तीविरूद्ध भादंवी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील. ज्याचे दूरगामी परिणामासह चारित्र्य खराब होऊन त्यांचे भविष्यातील नौकरीच्या व व्यवसायाच्या चांगल्या संधी सुद्धा गमवाव्या लागतील. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. सत्य परिस्थितीची खातरजमा करण्यासाठी तात्काळ संबधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये दोन गटात वाद; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधीक्षकांचे आवाहन