Chhatrapati Sambhaji Nagar...अखेर महानगरपालिकेच्या मुख्यालयात लागला 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक
Chhatrapati Sambhaji Nagar : महानगरपालिकेच्या टप्पा तीनमधील प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: केंद्र व राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे (Aurangabad City) नामकरण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) केल्यानंतर आता शहरात सरकारी कार्यालये, महापालिकेच्या इमारतींवरील औरंगाबादचे फलक बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी महापालिकेने प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीवरील औरंगाबाद नावाचे फलक काढले होते. त्यानंतर शनिवारी (25 मार्च रोजी) महानगरपालिकेच्या टप्पा तीनमधील प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावण्यात आला आहे. मात्र महापालिका आयुक्त आणि महापौर यांचे दालन असलेल्या मुख्यालयाच्या इमारतीवरील औरंगाबाद काढले असले तरीही, नवीन नाव अजून लावण्यात आलेले नाही.
केंद्र व राज्य शासनाने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. या निर्णयानुसार महापालिकेसह इतर शासकीय कार्यालयात औरंगाबादच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे नाव लिहिले जात आहे. दरम्यान महापालिकेचे प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत व टप्पा तीनच्या इमारतीवरील औरंगाबाद नाव बदलण्यात आले नसल्याने नाव बदलण्याची मागणी होत होती. त्यामुळे औरंगाबाद नावाचा फलक बदलून, त्याजागी छत्रपती संभाजीनगर असा फलक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नामफलक बदलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीन इमारतीच्या नामफलकावरील औरंगाबाद हे नाव गुरुवारी काढून टाकण्यात आले. त्यानंतर शनिवारी प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नाव पेंट करण्यात आले. तसेच मुख्य इमारतीवरही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नाव लवकरच टाकले जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महापालिकेत झाला होता नामांतराचा पहिला ठराव....
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी केली. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक महानगरपालिका निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा चर्चेत असायचा. विशेष म्हणजे जून 1995 मध्ये औरंगाबादचे 'संभाजीनगर' नामांतर करण्याचा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत पहिल्यांदा मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यामुळे ज्या महापालिकेत नामांतराचा पहिला ठराव घेण्यात आला त्या महापालिकेवर अखेर शनिवारी 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक झळकला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात 1 लाख 48 हजार आक्षेप, समर्थनार्थ केवळ 4166 सूचना