दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण; संभाजीनगरमधील व्हिडीओ व्हायरल
Chhatrapati Sambhaji Nagar : वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सिग्नल तोडल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शहरातील क्रांती चौकात हा सर्व प्रकार घडला असून, मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक पोलिसाकडून करण्यात आलेल्या एका मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शहरातील क्रांती चौकातील हा व्हिडीओ असून, एका चारचाकी वाहनचालकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ज्यात स्प्लेंडरवरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलीस मारहाण करताना पाहायला मिळत आहे. आपल्या गाडीवरून उतरून काही सांगण्याच्या आत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण सुरु केली. दुचाकीस्वाराच्या कानशिलात लागवत त्याला पाठीमागून लाथा देखील मारल्या. तरुण काही सांगण्याचा प्रयत्न करत असताना वाहतूक पोलिसाकडून मारहाण सुरूच होती. शेवटी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने तरुणाला बाजूला नेले. पण त्यानंतर देखील त्या वाहतूक पोलिसाची मारहाण सुरूच होती.
मारहाणीचा व्हायरल व्हिडीओ
दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसाकडून बेदम मारहाण; संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल #police #VideoViral #ChhatrapatiSambhajinagar pic.twitter.com/ZNaXIOuD0d
— ABP माझा (@abpmajhatv) May 20, 2023
पोलिसांची प्रतिक्रिया...
दरम्यान यावर पोलिसांची देखील प्रतिक्रिया समोर आली असून, व्हिडीओमधील तरुण अमरप्रीत चौकाकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जात असताना सिग्नल बंद झाला होता. त्यामुळे तो तरुण क्रांती चौकातील सिग्नलवर वाहतूक नियमन करणारे अंमलदार पोलीस नाईक चव्हाण यांच्याकडे आला. तसेच तुम्ही सिग्नल बंद का केला? असे म्हणत अरेरवीची भाषा करत शिवीगाळ करू लागला. वाहतूक अंमलदार यांच्या अंगावर धावून आला. हा तरुण दारू पिलेला होता. त्यामुळे त्याला वाहतूक अंमलदारांनी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे नेले होते. परंतु तेथे गेल्यावर तो वाहतूक अंमलदारांच्या हाता पाया पडायला लागला. त्यामुळे वाहतूक अंमलदारांनी नंतर त्याला सोडून दिले. तरीही या घटनेची सत्यता पडताळून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मारहाण करणे योग्य आहे का?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तरुण दारू पिलेला होता, तसेच त्याने शिवीगाळ देखील केली. त्यामुळे त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई करता आली असती. मात्र अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: