Mock Drill : 'संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट अन् धावपळ, थेट एनएसजी कमांडो दाखल'; मॉकड्रिल असल्याचे समजताच सुटकेचा निःश्वास
Chhatrapati Sambhaji Nagar News : हॉटेलच्या सर्व बाजूने फक्त पोलीस आणि पोलीसच असल्याने अक्षरशः छावणीचे स्वरूप आले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : सकाळी 11 वाजता अचानक जालना रोडवरfन पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत रामा हॉटेलमध्ये दाखल झाल्या. हॉटेल रामाचा ताबा अतिरेक्यांनी घेतल्याच्या बातमीने नागरिकांची धावपळ उडाली. परंतु तात्काळ हॉटेल रामाला एनएसजीच्या कमांडींनी वेढा घातला. हॉटेलच्या सर्व बाजूने फक्त पोलीस आणि पोलीसच असल्याने अक्षरशः छावणीचे स्वरूप आले. हॉटेलच्या आतमधून धूर पाहायला मिळत होता, तर बॉम्बस्फोट झाल्यासारखं आवाजही आला. त्यामुळे आतमध्ये काय घडतंय कुणालाच काहीही कळत नव्हतं. तेवढ्यात हँडग्रेनेडचा स्फोट करुन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची बातमी आली. त्यामुळे हॉटेलमध्ये नेमकं काय घडतंय कुणालाच कळत नव्हतं. मात्र काही वेळाने हा सर्व प्रकार मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे 120 जवान दोन दिवसांपासून विविध ठिकाणी मॉकड्रिल करत आहेत. या पथकाने गुरुवारी वेरुळ लेण्यांमध्ये, तर शुक्रवारी पहाटे पाच ते सकाळी 8 वाजेपर्यंत चिकलठाणा विमानतळावर आणि नंतर जालना रोडवरील हॉटेल रामातही मॉकड्रिल घेण्यात आले. अतिरेक्यांना कंठस्नान कसे घालावे याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करुन दाखवले. यावेळी कमांडोनी प्रत्यक्ष हँडग्रेनेडचा वापर केल्याने सकाळी 11.30 च्या सुमारास मोठा आवाज झाला. यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले होते. या हॉटेलला एनएसजी कमांडो आणि पोलिसांनी वेढा दिल्याने हॉटेलला छावणीचे स्वरुप आले होते. मुंबईतील 26 नोव्हेंबरच्या घटनेवेळी राष्ट्रीय सुरक्षा जवानांची बहादुरी देशाने पाहिली होती. अशी घटना राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी झाल्यास जनतेची सुरक्षा कशी करावी, याचे प्रात्यक्षिक एनएसजीच्या वतीने यावेळी करण्यात आले.
अशी झाली मॉकड्रिल
रामा इंटरनॅशनल जेथे विदेशी पर्यटक येत असतात. बॉम्बस्फोट आणि अतिरेकी अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) यांचे वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. नियंत्रण कक्ष येथे फोनवरुन माहिती प्राप्त झाली की, हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे समोरील लॉनवर बॉम्बस्फोट झाला असून काही अतिरेकी घुसले आहेत. त्यानंतर सदर माहिती पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांना देण्यात आली. नियंत्रण कक्षातून जलद प्रतिसाद पथक, दंगा काबू पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, मनुष्यबळ व वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ रामा हॉटेल येथे रवाना होण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर वाहन, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका इत्यादी वाहने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले.
तर घटनास्थळी कर्नल विलसिंग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षा दलाचे 112 जवान यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अतिरेकी हल्याच्या रंगीत तालीमच्या वेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, शिलवंत नांदेडकर, सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, निरीक्षक संभाजी पवार, दिलीप गांगुर्डे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
संभाजीनगर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, घटनास्थळी पोलीस दाखल