शिंदे-भाजपच्या युतीत पहिला 'घाव' पडला?; पैठणच्या बाजार समितीच्या निवडणूकीतून भाजपची माघार
Maharashtra Politics: आम्हाला कमी जागा दिल्या जात असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु असून, भाजप आणि शिंदे गटाची युती यामुळे तुटणार असल्याची देखील चर्चा आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीच गट घेऊन सत्तेत सामील होत असेल, तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिला आहे. अशातच शिंदे-भाजपच्या युतीत पहिला 'घाव' पैठणच्या बाजार समितीच्या निवडणुकीत (Paithan Market Committee Elections) पडताना पाहायला मिळत आहे. कारण पैठणच्या बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गटाकडून आपल्याला अपेक्षित जागा देण्यात येत नसल्याचा आरोप करत भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यासोबत बैठका घेऊन देखील, आम्हाला कमी जागा दिल्या जात असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
राज्यभरातील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूक जाहीर करण्यात आली असून, आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, लासूर स्टेशनसह छत्रपती संभाजीनगर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या देखील निवडणुका पार पडत आहे. मात्र पैठणमध्ये भाजपने शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. युतीबाबत शिंदे गटासोबत अनेकदा बैठक होऊन देखील खूप कमी जागा दिल्या जात असल्याने आपण माघार घेत असल्याचा आरोप भाजपचे नेते सुनील शिंदे यांनी केला आहे. तर शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासोबत देखील बैठक झाली, पण भाजपला अपेक्षित जागा मिळाला नसल्याचा देखील आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
एकूण 18 संचालकपदांसाठी निवडणूक
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 18 संचालकपदांसाठी निवडणूक होत आहे. तर 28 एप्रिल रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. या ठिकाणी भाजप-शिंदे गटा विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचा अंदाज होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी भाजपने माघार घेतली आहे. शिंदे गटाकडून भाजपला अपेक्षित जागा दिल्या जात नसल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
भाजपचे आरोप?
दरम्यान यावर बोलताना भाजप नेते सुनील शिंदे म्हणाले की, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसात आमच्या पक्षातील स्थानिक नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. तर राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीची सरकार असल्याने या निवडणुका देखील युतीतच लढवण्याच्या आदेश आम्हाला वरिष्ठांकडून मिळाला होता. दरम्यान या निवडणुकीत आम्ही 13 उमेदवारी अर्ज भरले होते. तसेच निवडणुकीतील युतीबाबत शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यासोबत काही बैठका देखील पार पडल्या. मात्र आम्हाला अपेक्षित असलेल्या जागा मिळत नव्हत्या. त्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक न लढवण्याचा स्थानिक भाजप नेत्यांनी मिळून निर्णय घेतला असल्याचं सुनील शिंदे म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ