Manoj Jarange : जात संपवू देऊ नका, मराठ्यांच्या मुलांसोबत उभे रहा; मराठा नेत्यांना मनोज जरांगेंचे आवाहन
Manoj Jarange : मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेलं षडयंत्र हाणुन पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून एकमेकांवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर पुन्हा एकदा जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ओबीसी नेते पोलिसांवर दबाव आणून मराठा समाजातील तरुणांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, जात संपवू देऊ नका, मराठ्याच्या मुलासोबत उभे रहा, हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही, असे आवाहन मराठा नेत्यांना मनोज जरांगे यांनी केले आहे.
याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मी यापूर्वी कधीच आवाहन केले नाही. पण आज मराठा नेत्यांना आवाहन करीत आहे. मराठा समाजातील मुलांच्या विरोधात सुरु असलेलं षडयंत्र हाणुन पाडण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मी आज सांगत आहे, समाजाने उद्या सांगायला नको अगोदर आम्हाला का सांगितले नाही. तर, जात संपवू देऊ नका मराठ्याच्या मुलासोबत उभे रहा, हीच योग्य वेळ असून, एकत्र आला नाही तर मराठा समाज कधीच माफ करणार नाही असे आवाहन जरांगे यांनी मराठा नेत्यांना केले आहे.
पोलिसांवर भुजबळ दबाव टाकतायत...
मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नेत्यांना दिली पाहिजे. तर, बीडच्या पोलिसांवर भुजबळ दबाव टाकत आहे. बीड पोलिसांनी घाबरायची गरज नाही. बीड पोलिसांच्यामागे मराठा समाज उभा आहे. जे दबाव तंत्र सुरू आहे, ते थांबल तर बरं होईल. अन्यथा जो निर्णय उशिरा घ्यायचा आहे तो आता घेऊ असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पुराव्यांच्या आधारेच आरक्षण मागतोय...
पुरावे मिळत असतील तर प्रमाणपत्र द्यावे असे सामान्य ओबीसींना वाटत आहे. ओबीसींना जास्तीचे आरक्षण घटनाबाह्य पद्धतीने देण्यात आले, ते कोणत्या नियमाने दिलं? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. आता आमचं हक्काचं मिळतंय, आमच्याकडे पुरावे आहे. मात्र, ते देखील मिळू देत नाहीत. परंतु, आरक्षण मिळेपर्यंत मराठे आता थांबणार नाही. तसेच, जी जागृती मराठा आणि ओबीसीमध्ये व्हायला पाहिजे होती, ती झालेली आहे. त्यामुळे संघर्ष होणार नाही, असेही जरांगे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
बीडमधील हिंसाचारात भुजबळांचे नातेवाईक, त्यांनीच हॉटेलची तोडफोड केली; जरांगेंचा गंभीर आरोप