Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळणार नाही; विमा कंपनीच्या कॉल सेंटरकडून शेतकऱ्यांना अजब उत्तर
Crop Insurance : सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
औरंगाबाद : पाऊस (Rain) पडत नसल्याने पिकं मातीमोल होत आहेत. अशातच पीक विमा (Crop Insurance) मिळाल्यास काहीतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना (Farmes) आहे. पण शेतकऱ्यांच्या यांच्या अपेक्षेवर पाणी फेरण्याचं काम पीक विमा कंपन्याच्या कॉल सेंटरकडून सुरु आहे. कारण शेतकऱ्यांना कॉल सेंटरकडून मिळणारे उत्तर संभ्रम निर्माण करणारे आहे. सोबतच सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
एकीकडे पाऊस नसल्याने डोळ्यादेखत उभं पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हताश होऊन विमा कंपन्यांकडे फोन करत आहेत. मात्र, विमा कंपनीच्या कॉल सेंटरवरचं एक उत्तर शेतकऱ्यांमध्ये अधिक संभ्रम आणि चिंता निर्माण करणारे आहे. त्याचं कारण असं की, शेतकऱ्यांना कॉल सेंटरवरुन जे उत्तर मिळतंय त्यानुसार पाऊस न पडल्याने पिकांचं नुकसान झाल्यास नुकसानभरपाईसाठी शेतकरी पात्र ठरत नाहीत. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे नुकसान झालंय आणि त्याची नुकसान भरपाई द्या, असा कंपनीकडे फोन केला. तसेच निपाणी गावातील आणखी एका शेतकऱ्याने देखील कंपनीकडे असाच फोन केला. मात्र, पाऊस न पडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणार नसल्याचं अजब उत्तर शेतकऱ्यांना देण्यात आले.
अधिकारी काय म्हणतात?
यावर आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक विमा द्यावा लागणार असल्याचं म्हटले आहे. तसेच पिक विमा कंपन्या अशा पद्धतीने कॉल सेंटरवरुन उत्तर देत असतील, तर त्यांना आम्ही लेखी कळवणार असल्याचं ते म्हणाले. तर यावर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतांना असा काही नियम नसून, सरकारी नियमानुसारचं कंपनी काम करत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
कोरडा-ओला दिवस नियमाचा फटका...
बरं एवढं होऊन सरकारी नियमांचा देखील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सरकारच्या नियमानुसार ओला आणि कोरडा दिवस अशी नोंद घेण्यात येत असते. मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. कारण अडीच एमएम पाऊस पडल्यास सरकारी नियमानुसार तो ओला दिवस पकडला जातो, अन्यथा कोरडा दिवस समजला जातो. पण अडीच एमएम पावसात आपण उभा राहिल्यास साधा शर्ट देखील पूर्णपणे ओला होणार नाही. मग पीक कसे जगतील. विशेष म्हणजे 20 दिवस कोरडे दिवस गेल्यावर त्याच दिवशी अडीच एमएम पाऊस झाल्यास आणखी पुढील 21 दिवस कोरडे गेल्यावरचं पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे, याच नियमामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी पीक विमाच्या 25 टक्के अग्रीमपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: