'ॲनिमल' चित्रपटाच्या पोस्टवरून संभाजीनगरात तणाव; पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात
Chhatrapati Sambhaji Nagar : शहरातील जिन्सी भागात रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात आली.
छत्रपती संभाजीनगर : रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ॲनिमल' सिनेमावरून सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा पुढे आक्षेपार्ह धार्मिक वादापर्यंत पोहचली आणि त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जिन्सी भागात रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात आली. तर, पोलिसांनी या प्रकरणी किशोर गणेश गव्हाणे (वय 27 वर्ष, रा. वैजापूर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमावरून इन्स्टाग्रामवर चर्चा सुरु होती. याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने टाकल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमला. प्रकरण हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर जिन्सीतील पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम समाजातील महत्वाच्या लोकांच्या मदतीने जमावाला शांत करण्याचे आवाहन केले. सोबतच तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.
काय आहे प्रकरण?
सऊद नावाच्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर किशोर नावाच्या अकाऊंटवरून मुस्लिम समाजातील मुली व महिलांबाबत अश्लील भाषेत पोस्ट करण्यात आल्या होत्या. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच जमाव जिन्सी पोलीस ठाण्यासमोर जमला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधिकाऱ्यांनीही तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही सुरू केली. याशिवाय प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिन्सी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून घेत पोलिसांच्या फिरत्या वाहनावरून सर्व तरुणांना शांततेचे आवाहन करण्यात आले. सोबतच, संबंधिताचे अकाऊंट डिलीट करण्यात आले. विशेष म्हणजे स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि जमाव देखील कमी झाला.
आरोपी भोपाळला पळून जाणार होता...
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मुस्लीम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील असे माहीत असुन सुध्दा जाणीवपुर्वक हिंदु व मुस्लीम धर्मीयामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्येशाने जाणीवपुर्वक इंस्टाग्रामवर मॅसेज टाकुन कृत्य केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात मोठया प्रमाणावर मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते जमाव जमल्याने कायदा व सुव्यवस्थेची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. तर, या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, गुन्हयातील आरोपी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पळुन जात आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करुन आरोपी किशोर गणेश गव्हाणे (वय 27 वर्षे रा. बाभुळगांव बु, ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याचा शोध घेवुन त्याला कन्नड येथुन ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: