(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराला संपवलं, विवस्त्र करून केली होती मारहाण
Chhatrapati Sambhaji Nagar : माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याला ही बाब कळेल, वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली होती.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या (Murder) केली आहे. ओळखीच्या लोकांच्या मदतीने या महिलेने प्रियकराला विवस्त्र करून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला शहरातील साई टेकडी परिसरात फेकून दिले होते. दुसऱ्या दिवशी लोकांना मृतदेह आढळून आल्यावर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आनंद साहेबराव वाहुळ (वय 27 वर्षे, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचे एका 45 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते आणि ते दोघेही चार वर्षांपासून 'लिव्ह इन' मध्ये राहत होते. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र, मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला आणि येताच महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळा माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याला ही बाब कळेल, वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली. मात्र, तरी आनंद ऐकत नव्हता."
दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले
चार वर्षांपासून 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने आनंदला आता यापुढे आपल्याला एकत्र राहता येणार नसल्याचे सांगितले. तसेच, मला सोडून दे अशी विनंती देखील केली. पण, आनंदला हे मान्य नव्हते. शेवटी महिला व तिचा मुलगा व अन्य तीन आरोपींनी 13 डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. तर, साई टेकडी परिसरात ईव्हीनिंग वॉकिंगला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळल्याने त्यांनी तात्काळ चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनदासाठी घाटीतील शवागृहात पाठवून दिला.
विवस्त्र करून बेदम मारहाण
चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या महिलेने आनंदला यापुढे एकत्र राहता येणार नसल्याचे सांगून देखील तो यासाठी तयार नव्हता. त्यामुळे तिने इतर चार जणांच्या मदतीने आनंदला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: