Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरात 200 पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसांकडून शांततेचं आवाहन
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar News) जिल्ह्यात 10 गुन्ह्यांमध्ये 200 पेक्षा अधिक अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 59 आंदोलनकर्ते निष्पन्न झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू असून, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर येत आहे. त्यामुळे आता पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar News) जिल्ह्यात 10 गुन्ह्यांमध्ये 200 पेक्षा अधिक अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 59 आंदोलनकर्ते निष्पन्न झाले आहेत. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. आमदारांचे घर, राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करून आग लावण्यात आली. याचे, पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळाले. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. सोबतच, अनेक ठिकाणी रास्ता रोको करून टायर जाळण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांना थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार मागील दोन दिवसांत जिल्ह्यात करण्यात आलेल्या अनेक आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10 गुन्ह्यांमध्ये 200 पेक्षा अधिक अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडला नाही
ग्रामीण भागात ठिकठिकाणी रोज आंदोलन होत आहे. तर, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, पाचोड, वडोद बाजारमध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, निष्पन्न आंदोलनकर्त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या खबरदारी आणि योग्य नियोजनामुळे जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहर आणि ग्रामीण पोलीस सातत्याने आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात असून, प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांकडून शांततेचं आवाहन
मराठा आरक्षणावरून मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक आंदोलन पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीस अलर्ट झाले आहे. पोलिसांकडून मराठा आरक्षणाबाबत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवलं जात आहे. तसेच आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे, कायदा हातात घेऊ नाही, तोडफोड किंवा जाळपोळ करण्याचा प्रयत्न करू नयेत. सोबतच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा: