AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी
AUS vs SL Test Series: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा श्रीलंका दौरा 29 जानेवारी पासून सुरु होत आहे.
Australia vs Sri Lanka Squad Announcement Test Series सिडनी: ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारताला 3-1 नं पराभूत केलं. याद्वारे त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारताला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं मनोबल वाढलंय. ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध ते 2 कसोटी सामने खेळतील. श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथच्या नावाची घोषणा केली आहे. ट्रॅविस हेडकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. पॅट कमिन्स वैयक्तिक कारणानं संघासोबत नसणार आहे. श्रीलंका दौऱ्यातून त्यानं माघार घेतली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 29 जानेवारीपासून सुरु होईल. या मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणाऱ्या नॅथन मॅकस्वीनी याला आणखी एक संधी दिली गेली आहे. सॅम कॉन्सटासनं भारताविरुद्धकसोटी मालिकेत पदार्पण करताना 60 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो चांगली कामगिरी करु शकला नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या संघात त्याला देखील स्थान देण्यात आलं आहे.
सिडनी कसोटीत 10 विकेट आणि पाच सामन्यांपैकी 3 सामने खेळून 21 विकेट काढणाऱ्या स्कॉट बोलेंडला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. मिशेल मार्श, शॉन एबट आणि बोलेंड गोलंदाजीची धुरा सांभाळतील. भारताविरुद्ध शेवटच्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरला देखील श्रीलंका दौऱ्यात स्थान मिळालं आहे.
दोन सामन्यांची कसोटी मालिका श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं संघात फिरकी गोलंदाजांना देखील स्थान दिलं आहे. यामध्ये नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन्ही कसोटी सामने गॉल स्टेडियममध्ये होतील. ऑस्ट्रेलिया यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आला होता त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा श्रीलंकेनं 3-0 अशी मालिका जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड,मिशेल स्टार्क, बोलंड, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी, ब्यू वेबस्टर
ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत
भारताला सिडनी कसोटीत पराभूत करत ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. अंतिम फेरीची लढत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
इतर बातम्या :