तोडफोडीचे लोण आता संभाजीनगरात; भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडलं
Maratha Reservation : अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे. दरम्यान याच हिंसक आंदोलनाचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यावेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयातील काचा फोडल्या, खुर्च्या देखील तोडल्या आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यभरात आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी हिंसक आंदोलन देखील पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. तर, काही ठिकाणी तोडफोड देखील पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटून दिल्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी ही केली आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात घुसून आंदोलकांनी तोडफोड केली आहे. तसेच, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करत घोषणाबाजी केली. दरम्यान, याची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आंदोलकांना ताब्यात घेऊन, रस्ता मोकळा केला.
जलील यांच्या घरासमोर घोषणाबाजी...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांना जाब विचारला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर देखील मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी जलील यांनी आंदोलकांशी चर्चा करत, आपला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठींबा असल्याचे सांगितले.
गावागावात आंदोलन...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाज देखील आक्रमक होत आहे. गावागावात आंदोलन केले जात आहे. कुठे साखळी उपोषण, तर कुठे आमरण उपोषण पाहायला मिळत आहे. अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर काही गावात सरकारचे अंत्यसंस्कार करत आंदोलन करण्यात येत आहे. तसेच यापुढे आणखी आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: