Aurangabad : औरंगाबाद पोलिसांचा धाक संपला! नशेखोर टोळक्यांची दहशत वाढली, वाहनांचीही तोडफोड
Aurangabad Crime News : कटकट गेट परिसरातील मैदानावर उभ्या केलेल्या सहा ते सात वाहनांची अज्ञाताने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
Aurangabad Crime News : गेल्या काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) शहरात नशेखोरांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे तरुण मुलं नशेच्या आहारी जात आहे. तसेच या नशेखोर तरुणांची गुंडगिरी वाढली असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, अशाच काही घटना शहरातील कटकट गेट परिसरात पाहायला मिळत आहे. मैदानावर उभ्या केलेल्या सहा ते सात वाहनांची अज्ञाताने तोडफोड केली. कटकट गेट परिसरातील रवींद्रनगर भागात 13 जुलैच्या मध्यरात्रीनंतर पहाटे 3 वाजता हा प्रकार समोर आला. या गाड्या कोणी आणि का फोडल्या हे समजू शकले नाही. मात्र, या परिसरात काही नशेखोर तरुणांची प्रचंड दहशत असून, त्यांच्याकडून हे कृत्य गेल्याचं बोललं जात आहे.
नशेखोर टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड
किरकोळ कारणावरून जमाव एकत्र येण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. असेच काही प्रकार गेल्या काही दिवसांत जिन्सी भागात सतत घडत आहे. तरुण मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. शुक्रवारी पहाटे तीन वाजता या भागात अचानक गोंधळ उडाला. नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले असता मैदानावर उभ्या केलेल्या सात कारच्या काचा फोडलेल्या दिसल्या. या परिसरात रात्रभर तरुणांचे, नशेखोरांचे घोळके फिरून धिंगाणा घालतात. पहाटे दोन वाजता दुचाकीवरून आलेल्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर जिन्सी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, कोणतीही तक्रार न आल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नशेखोरांचे घोळके आणि दहशत वाढली
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी नशेच्या गोळ्या सहजपणे विक्री केल्या जात आहे. तसेच गांजा, चरस, ड्रग्स घेणाऱ्यांची प्रमाण देखील वाढले आहे. विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलं आणि तरुण मुलं मोठ्या प्रमाणात आहारी गेले आहेत. शहरातील अनेक मेडीकलवर देखील नशेच्या गोळ्या विक्री केल्या जात असल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे नशा करुन गुंडगिरी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. यातूनच गाड्या फोडणे, मुलींची छेड काढणे, नागरिकांना अडवून पैशाची मागणी करणे, छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वाद घालून मारहाण करणे असे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिक अशा नशेखोर टोळक्यांना घाबरत असल्याने पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.
शहरातील मैदान नशेखोरांचे अड्डे
शहरातील अनेक भागात छोटे-मोठे मैदानं आहेत. तर हीचं मैदाने या नशेखोरांसाठी अड्डे बनले आहेत. रात्रीच्या सुमारास या मैदानात तरुणांचे टोळके जमा होतात, या ठिकाणी बसून बिनधास्तपणे नशा करतात. त्यानंतर हीच नशेखोरांची टोळी परिसरात धुडगूस घालते. एवढंच नाही तर रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या जातात. अशा घटनांनी औरंगाबादकर सध्या दहशतीखाली आहे. तर, दुसरीकडे पोलिसांचा धाकच उरला नसल्याचं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :