(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; एकाच दिवशी चार 'सभा'
Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोकणाचा दौरा केला होता आणि आता ते मराठवाड्याचा (Marathwada) दौर करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) जनतेशी संवाद साधण्यासाठी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोकणाचा दौरा केला होता आणि आता ते मराठवाड्याचा (Marathwada) दौर करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यात ते गंगापूर -रत्नपुर, वैजापूर, कन्नड- सोयगाव, छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut), शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve), मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार देखील शिवसेनेचे निवडून आले होते. तसेच, लोकसभा निवडणुकीत देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने 2014 पर्यंत सलग चार वेळा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. तसेच मागील 30 वर्षांपासून महानगरपालिकेची सत्ता देखील शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संभाजीनगरचा दौरा करत आहेत. आपल्या याच सभेतून ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे याबाबत काही अधिकृत घोषणा करतात का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...
- उद्धव ठाकरे यांचे सोमवारी सकाळी 10 वाजता विमानाने संभाजीनगर शहरात आगमन होईल.
- दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील
- त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील
- त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत.
- सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.
दानवे-खैरे इच्छुक...
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकजण उत्सुक होते. त्यामध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उत्सुक असल्याचं समोर आलं होतं. पण ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे. चंद्रकांत खैरे यांना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून तब्बल 2 लाख 83 हजार 798 मते घेतली होती. याचाच फटका खैरे यांना बसला होता.
इतर महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार