Chhatrapati Sambhaji Nagar : वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या पाच दुकानांचे परवाने निलंबित; 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई
Chhatrapati Sambhaji Nagar News : 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या पाच दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) वाढीव दराने बियाणे विक्री केली जात असून, शेतकऱ्यांची होणारी लुट कशी सुरु आहे याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवले होते. दरम्यान 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कृषी विभाग खडबडून जागे झालं असून, वाढीव दरात बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई सुरु झाली आहे. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या पाच दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बियाणे वाढीव दराने विकण्यात येत असल्याचे वृत्त एबीपी माझाने आज सकाळी दाखवले होते. दरम्यान याची दखल घेत कृषी विभागाने वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील एकूण पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ज्यात विशाल कृषी सेवा केंद्र पाचोड, श्रीराम कृषी सेवा केंद्र पाचोड, प्लांटेशन ऍग्रो सेंटर पैठण, अमृत ऍग्रो एजन्सी विवाह मांडवा, स्वामी ट्रेडर्स विवाहमांडवा, ओम साई कृषी सेवा केंद्र वैजापूर, किसान ऍग्रो एजन्सी देवगावरंगारी या दुकानांचे समावेश आहे.
काय म्हणाले कृषीमंत्री सत्तार...
दरम्यान यावर बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, 'एबीपी माझा'ने केलेलं स्टिंग ऑपरेशन मी पाहिले आहे. ज्यात काही कृषी सेवा केंद्र चालक दुप्पट, तिप्पट भावाने बियाणे विकत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्यावर मी कारवाई केली असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. फक्त निलंबित करून होणार नाही. तर अशा लोकांसाठी मी भविष्यात असा कायदा आणणार आहे की, ज्यात या लोकांचा एक वर्षे जामीन होणार नाही. तसेच त्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत.
टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार...
पेरणीच्या तोंडावर कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची मोठी लुट सुरु आहे. अनेक ठिकाणी वाढीव दराने बियाणे विकले जात आहे. तर काही ठिकाणी बोगस बियाणे आणि खताची विक्री केली जात आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची आता कृषी विभागाने दखल घेतली असून, कारवाई सुरु केली आहे. सोबतच राज्यात कोठेही अशी फसवणूक सुरु असल्यास याची थेट टोलफ्री नंबरवर फोन करून तक्रार करता येणार आहे. तर यासाठी 18002334000 हा टोलफ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तसेच यापुढे वाढीव दराने आणि बोगस बियाणे विकणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली जाणार असल्याचे सुद्धा सत्तार म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: