Nath Shashti Festival: पैठणच्या नाथषष्ठी यात्रेला सुरुवात; नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यास सुरवात
Nath Shashti Festival 2023: रांजण ज्या दिवशी भरतो, त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे.
Nath Shashti Festival 2023: मराठवाड्यातील महत्वाच्या यात्रेपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणची (Paithan) यात्रा म्हणजेच नाथषष्ठी यात्रेला (Nath Shashti Festival) सुरुवात झाली आहे. असे म्हणतात की, शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) वाड्यातील रांजणात भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपाने गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरला होता. तर त्याच पवित्र रांजणाची विधिवत पूजा करुन त्यात पाणी भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. रांजण भरण्यास सुरुवात होताच नाथषष्ठी महोत्सवास औपचारिक प्रारंभ झाला. तसेच हा रांजण ज्या दिवशी भरतो, त्या दिवशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण नाथषष्ठी सोहळ्यास उपस्थित होतात, अशी शेकडो वर्षांची वारकऱ्यांची धारणा आहे.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते पवित्र रांजणाची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर गुरुवारी भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्ण कुणाच्याही रुपात उपस्थित राहतात, असे मानले जाते. ज्याच्या हातून पवित्र रांजण भरला जातो, त्यास भगवान श्रीकृष्ण माणून नाथवंशजांच्यावतीने मान देण्यात येतो. त्यामुळे रांजण भरण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर 13 ते 15 मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे.
नाथषष्ठी महोत्सवात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे
नाथषष्ठी महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पैठणला येत असतात. तर शहरातील विविध भागात आपले फड, राहुट्या टाकून वारकरी तीन दिवस नाथभक्तीत लीन होतात. मात्र यंदा नाथषष्ठी महोत्सवावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर पुढे देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या नाथषष्ठी महोत्सवात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. मात्र असे असले तरीही स्थानिक प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे. पैठण न.प. प्रशासनाने पाऊस आल्यास वारकऱ्यांच्या 193 दिंड्यांची पर्यायी व्यवस्था शहरातील संतपीठ, विविध शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालये आदी 36 ठिकाणे वारकऱ्यांसाठी आरक्षित केल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली आहे.
दिंड्या निघाल्या पैठणकडे...
13 ते 15 मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या दिंड्या पैठणकडे कूच करत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर-पैठण मार्गावरुन पैठणकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे लांबचा पल्ला असणाऱ्या अनेक दिंड्या मोठा प्रवास करुन पैठणमध्ये दाखल होतात. त्यामुळे अनेक मुक्काम करत 15 ते 20 दिवस आधीच या दिंड्या निघतात.
इतर महत्वाच्या बातम्या:
पैठणच्या नाथषष्ठीच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना देणार निमंत्रण - संदीपान भुमरे