(Source: ECI/ABP News/ABP Majha)
APMC Election: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण आणि फुलंब्री बाजार समितीसाठी मतदानाला सुरुवात
APMC Election 2023 : आज गंगापूर, पैठण आणि फुलंब्री बाजार समितीसाठी मतदान होत असून, अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
APMC Election 2023 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण, गंगापूर व फुलंब्री या तीन बाजार समित्यांसाठी आज (30 एप्रिल) रोजी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुुवात झाली आहे. विशेष म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगर, कन्नड आणि वैजापूर बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. दरम्यान आज गंगापूर, पैठण आणि फुलंब्री बाजार समितीसाठी मतदान होत असून, अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सकाळपासूनच नेत्यांची मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या एकूण 18 जागांसाठी 3 हजार 838 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानातून येथील 38 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मतमोजणी 1 मे रोजी पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात करण्यात येणार आहे. येथे पालकमंत्री संदीपान भुमरे व महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होत असून, इतर दोन अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
गंगापूर बाजार समितीसाठी एकूण 18 जागांसाठी 1 हजार 648 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी गंगापूर येथे एका मतदान केंद्रावर 4 बूथ, तर वाळूज येथे एका मतदान केंद्रावर 2 बूथ ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी एकूण 40 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीनंतर दुपारी 4 वाजता गंगापूर जि. प. शाळेत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
फुलंब्री बाजार समितीमध्ये एकूण 18 जागांसाठी 2 हजार 489 मतदार आहेत. मतदानासाठी शहरातील जिल्हा परिषद शाळेत एकाच ठिकाणी 7 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. महाविकास आघाडी, भाजपा-शिवसेना शिंदे गट आणि शिंदे गटाचा दुसरा गट अशा तीन पॅनलमध्ये लढत होत आहे. येथे दुपारी 4 वाजता शहरातील जि.प. शाळेत मतमोजणी होणार आहे.
लासूर स्टेशन बाजार समितीचं निकाल...
दरम्यान 28 एप्रिल रोजी लासूर स्टेशन बाजार समितीसाठी निवडणूक पार पडली होती, आणि आज दुपारी याची मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी रविवारी दुपारी 4 वाजता होणार आहे. येथे भाजपाचे आमदार प्रशांत बंब, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, उपसरपंच संपत छाजेड, किरण पाटील डोणगावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे तीन पॅनलमध्ये लढत होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: