(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रस्त्यावरून ब्रँडेड कंपनीचे टी-शर्ट विकत घेताय तर होऊ शकते फसवणूक, पाहा नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhaji Nagar : याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: ब्रँडेड कंपनीचे टी-शर्ट घालण्याचा मोह सर्वांनाच असतो. विशेष म्हणजे यासाठी दोन पैसे अधिक देण्याची देखील तयारी असते. पण अनेकदा टी-शर्ट घेताना त्यावर ब्रँडेड कंपनीचे लोगो पाहून आपण विकत घेतो. पण याचवेळी तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) पंढरपूर येथे नामांकित कंपनीचे बनावट लोगो लावून टी-शर्टची विक्री करणाऱ्या दोघांस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपेश जितेंद्र गुप्ता (रा. बोरिवली, मुंबई) हे नेत्रिका कन्सल्टंट इंडिया या कंपनीत वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या कंपनीच्या लिवाईस नावाचे बनावट लोगो लावून नारेगाव येथील काही विक्रेते वाळूज एमआयडीसीत टी-शर्टची विक्री करत असल्याची माहिती त्यांच्या कंपनीला मिळाली होती. यावरुन क्षेत्रीय अधिकारी दीपेश गुप्ता आणि त्यांचे सहकारी मनोज सुर्वे हे 8 एप्रिल रोजी रात्री पंढरपूर येथील तिरंगा चौकात पाळत ठेवून होते.
2 लाख 96 हजार रुपये किमतीचे 327 टी-शर्ट जप्त
दरम्यान रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांना मिळालेल्या माहितीच्या वर्णनानुसार संशयित इसम दुचाकीवरुन तिरंगा चौकातून त्यांना जाताना दिसला. त्यामुळे गुप्ता यांनी दोन दुचाकी थांबवून दुचाकीवरील गोण्यांची तपासणी केली. यावेळी त्यांना गोण्यांमध्ये लिवाईस कंपनीचे बनावट लोगो लावलेले 2 लाख 96 हजार रुपये किमतीचे 327 टी-शर्ट मिळून आले. यावेळी त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शेख सईद शेख पाशा आणि शेख हजर शेख पाशा (दोघेही रा. खोकडपुरा, जि. छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले.
पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल...
आपल्या कंपनीचे बोगस लोगो लावून टी शर्ट विकणाऱ्या दोघांना पकडून गुप्ता यांनी पोलिसांना कळवले. तर याबाबत माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्या नंतर या प्रकरणी गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रस्त्यावर असलेल्या दुकानातून ब्रँडेड कंपनीचे टी-शर्ट घेत असाल तर, ते ओरिजिनल आहे का? याची खात्री करावी. अन्यथा अधिकचे पैसे देऊन ब्रँडेड कंपनीचे टी-शर्टच्या नावाने तुमच्या हातात लोकल टी शर्ट पडेल.
इतर महत्वाच्या बातम्या :