(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Acid Attack : छत्रपती संभाजीनगरातील दोघांवर अॅसिड हल्ला; सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Chhatrapati Sambhaji Nagar : यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील गंगापूरच्या धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या फतियाबाद येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, दोघांवर अॅसिड हल्ला (Acid Attack) करण्यात आला आहे. कंपनीतील दोन कामगारांवर चोरीचा आळ घेऊन एका सुरक्षारक्षकाने हा ॲसिड हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (11 मार्च) रात्री साडेनऊ वाजेदरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. सज्जन बमनावत (वय 25 वर्षे) व दिवानसिंग जोनवाल (वय 52 वर्षे, दोघेही रा. गोकुळवाडी, ता. गंगापूर) असे जखमींचे नावं आहेत. तर माधव पांचाळ (वय 50 वर्षे) असे अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिवानसिंग जोनवाल व सज्जन बमनावत हे दोघे फतियाबादजवळील जी. डी. केमिकल इंडस्ट्रिज या कंपनीत काम करतात. रात्रपाळी असल्याने दोघे रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान कंपनीत हजर झाले. तेव्हा सुरक्षारक्षक असलेला तसेच खाली वेळेत सुतारकाम करणारा आरोपी माधव पांचाळ हा त्यांच्याजवळ आला. तर माझा वाकस (लाकडे तासण्याचे लोखंडी हत्यार) दिसत नाही, असे दोघांना म्हणाला.
दरम्यान वाकसबाबत कोणतेही माहिती नसल्याने सज्जन आणि दिवानसिंग यांनी तसे सांगितले. मात्र काल तुम्ही दोघे रात्रपाळीवर होता. तेव्हा तुम्हीच तो नेल्याचा आरोप सुरक्षारक्षक पांचाळ याने केला. त्यामुळे यावरुन तिघांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी कंपनीतील अजय राजपूत, संजय सूर्यवंशी, संजू सुंदडे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. तसेच पांचाळ याला बाजूला नेले.
थेट अॅसिड हल्ला केला...
तिघांमधील वाद सोडवल्यावर थोड्याच वेळात माधव पांचाळ हा कंपनीतून अॅसिड घेऊन आला. त्याने पाठीमागून येऊन सज्जन बमनावतच्या चेहऱ्यावर तसेच अंगावर अॅसिड फेकले. तसेच दिवानसिंग जोनवाल यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र अॅसिड त्यांच्या पायावर पडले. यावेळी इतर कामगार धावत आले आणि त्यांनी माधव पांचाळला पकडून बाजूला केले. या घटनेत दोघेही भाजले असून त्यांना इतर कामगारांनी तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये दाखल केले होते. तर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपी माधव पांचाळ याच्यावर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर पुढील तपास सपोनि. संजय गीते हे करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :