संभाजीनगरमधील राड्यात पोलिसांचे वाहने जाळण्यात सर्वात पुढे असणाऱ्या दोघांना बेड्या, आतापर्यंत 81 जण अटकेत
Chhatrapati Sambhaji Nagar News : विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले हे दोघेही पोलिसांची वाहने जाळायला सर्वांत पुढे असल्याचे तपासात समोर आले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) जिन्सीतील किराडपुरा येथील राम मंदिरासमोर दोन गटात राडा झाला होता. या प्रकरणी आरोपींची ओळख पटवून पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. दरम्यान आतापर्यंत 81 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मंगळवारी देखील आणखी दोन म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले हे दोघेही राम मंदिरासमोर घोषणाबाजी करणाऱ्या गटाला मारहाण करण्यास आणि नंतर पोलिसांची वाहने जाळायला सर्वांत पुढे असल्याचे तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जाळण्यात अग्रेसर असलेल्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सय्यद जुहूर सय्यद मोहीम, सय्यद इलियास सय्यद नाजेर अशी दोघांची नावे आहेत. दोघेही जिन्सी भागातली राहणारे आहेत. विशेष म्हणजे दुचाकीवरुन येऊन वाहने जाळणाऱ्या या दोघांचा वीस दिवसांपासून शोध सुरू होता. किराडपुरा दंगलीत पोलिसांची 14 वाहने जमावाने जाळली होती. ती वाहने सुरुवातीलाच पेटवणारी आणि एकापाठोपाठ एका वाहनांना आग लावण्यात अग्रेसर असलेले दोघे मोटार सायकलवरुन आले होते. किराडपुरा दंगल प्रकरणी 79 दंगेखोरांना अटक केल्यानंतर वाहने पेटवलेल्यांचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यात दोन मित्र दुचाकीवरुन येताना आणि जाताना फुटेजमध्ये कैद झाले. तपासात ते जुहूर आणि इलियास असल्याचे निष्पन्न झाले. दंगलीनंतर दिवसा ते घरापासून लांब राहण्यावर भर देत होते. न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून शोध...
शहरातील किराडपुरा भागात झालेल्या राड्यात 300 ते 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जाळण्यात अग्रेसर असलेले दोघे सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सय्यद जुहूर सय्यद मोहीम, सय्यद इलियास सय्यद नाजेर अशी दोघांची नावे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अखेर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
दिवसा घरी येण्याचं टाळत होते...
छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यातल्या दंगलीत वाहने जाळण्यात अग्रेसर असलेले दोघे सीसीटीव्हीत कैद झाल्यावर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र आपल्याला पोलीस पकडतील म्हणून, सय्यद जुहूर सय्यद मोहीम, सय्यद इलियास सय्यद नाजेर हे दोघेही दिवसा घरी थांबत नव्हते. तर रात्री उशिरा घरी येत होते. मात्र अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
