सैराटच्या पुनरावृत्तीने संभाजीनगर हादरलं, प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या
Chhatrapati Sambhajinagar : प्रेमसंबंधावरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या (Murder) केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचं नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी 'माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.
दरम्यान काही वेळात तिथे चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे तिथे धावतच आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरु केली. तसेच हातात असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे चंद्रकलाबाई यांचे आई वडिल देखील आले. त्यांनी शमीम याना मारहाण करत दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले. दरम्यान, शमीमने त्यांच्या तावडीतून सुटले आणि थेट पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे प्रेमसंबंधावरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आहे.
पोलिसांची घटनास्थळी भेट...
बावस्कर भावांच्या तावडीतून सुटलेले शमीम सुरवातीला थेट पहूर पोलिस ठाण्यात पोहचले. यावेळी त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, घटनास्थळ फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पहूर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. तर, सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
माजी उपसभापतीच्या लॉजवर सुरु होता कुंटणखाना, पोलिसांनी धाड टाकताच समोर आली धक्कादायक माहिती