(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाळणा हलणार! संभाजीनगरमधील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघीण तिसऱ्यांदा आई बनणार
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे, मागील 28 वर्षांत या उद्यानात 40 वाघांचा जन्म झाला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. कारण सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघीण (Tigress) तिसऱ्यांदा आई बनणार आहे. तीन वर्षांपूर्वी समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर आता समृद्धी पुन्हा गर्भवती असून आगामी काही दिवसांत 'गुड न्यूज' मिळणार आहे. त्यामुळे सफारी पार्कचे काम होण्यापूर्वी प्राणिसंग्रहालयातील वाघीण पिलांना जन्म देणार असल्याने उद्यानातील वाघांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे, मागील 28 वर्षांत या उद्यानात 40 वाघांचा जन्म झाला आहे.
महापालिकेने 1995 मध्ये पंजाबच्या सतबीर झूमधून पिवळ्या, तर भुवनेश्वरच्या प्राणिसंग्रहालयातून पांढऱ्या वाघांची जोडी आणली होती. त्यापासून उद्यानात आतापर्यंत 40 वाघांचा जन्म झाला आहे. वाघांना फिरण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पिंजरे असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत मनपाच्या प्राणिसंग्रहालयातील जागा अपूर्ण पडत आहे. त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेने मनपाने वाघांचे प्रजनन थांबविले होते. मात्र, आता या प्राणिसंग्रहालायातील सर्व प्राणी मिटमिटा भागांत विकसित होणाऱ्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत. या सफारी पार्कमधील पिंजरे मोठ्या क्षमतेचे आहेत. दरम्यान नर-मादी वाघांना सहवासात सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच शहरवासीयांना लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 25 डिसेंबर 2021 रोजी समृद्धी या पिवळ्या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या वाढली होती. त्यांतील वाघांची एक जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातला पाठविण्यात आली आहे. त्यापूर्वी सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या आणखी वाढणार मुंबईला एक जोडी पाठविण्यात आली होती. आता समृद्धी पुन्हा गर्भवती असल्याने उद्यानात वाघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
उद्यानात सध्या 10 वाघ
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या 10 वाघ आहेत. त्यांतील सहा मादी तर चार नर आहेत. देशात वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर मनपावर वाघांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. वाघांना योग्य वातावरण मिळणाऱ्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील 28 वर्षांत 40 वाघांचा जन्म झाला आहे.
आतापर्यंत 9 बछड्यांना जन्म
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघीण ‘समृद्धी’ तिसऱ्यांदा गर्भवती राहणार आहे. यापूर्वी समृद्धीने 2 वेळ तब्बल नऊ बछड्यांना जन्म दिले होते. वाघिणीची गर्भधारणा 90 दिवसांची असते, त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवसांत गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Aurangabad: सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी निघाल्या गुजरातला; तर नवीन 21 प्राणी दाखल