(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी निघाल्या गुजरातला; तर नवीन 21 प्राणी दाखल
Aurangabad News: औरंगाबादेतील दोन वाघिणी आणि सहा काळवीट अहमदाबादला देण्यात येणार आहेत.
Aurangabad News: औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात (Siddharth Garden And Zoo) आता आणखी नवीन 21 प्राणी दाखल झाले आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातील या नवीन प्राण्यांना आणले गेले आहेत. यामध्ये सायाळ, इमू, कोल्हे आणि स्पूनबिल पक्षी यांचा समावेश आहे. आता या प्राण्यांच्या बदल्यात औरंगाबादेतील दोन पिवळ्या वाघिणी आणि सहा काळवीट अहमदाबादला देण्यात येणार आहेत. अहमदाबाद येथून आलेलं हे पथक दोन दिवस औरंगाबादेत (Aurangabad) मुक्कामी थांबणार असून, त्यानंतर वाघिणी आणि काळवीट यांना घेऊन गुजरातला परतणार असल्याचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले.
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील काही एकाकी प्राणी आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. दरम्यान याच काळात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून हे प्राणी देण्यास मंजुरी दिली होती.
अशी आहे प्राण्यांची अदलाबदल...
गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात सोमवारी 10 सायाळ, 2 इमू, 3 कोल्हे, आणि 6 स्पूनबिल पक्षी घेऊन पथक दाखल झाले. त्यनंतर सहाय्यक प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. डी. पी. सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली पथक हे प्राणी घेऊन इथे आले होते. सुरुवातीला डॉ. नीती सिंह यांनी या प्राण्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांचे आरोग्य ठीक असल्याचे दिसून, आल्यानंतर त्यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले. आता हे पथक इथे दोन दिवस मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर ते इथून रंजना आणि प्रतिथा या दोन पिवळ्या वाघिणी आणि सहा काळवीट घेऊन परतणार आहे.
वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणिसंग्रहालय चांगले ठिकाण
औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात सध्या 14 वाघ आहेत. तर आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे 26 वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणिसंग्रहालय चांगले ठिकाण ठरले आहे. मागील काही वर्षांत येथे तीसहून अधिक वाघ जन्मले आहेत. त्यामुळेच देशभरातील प्राणिसंग्रहालयांकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होते. त्यातच आता गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात दोन पिवळ्या वाघिणी जाणार आहेत.
काँग्रेसने केला होता विरोध...
दरम्यान गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील दोन पिवळ्या वाघिणी दिल्या जाणार असल्याने याला काँग्रेसने विरोध केला होता. याबाबत काँग्रेसने मनपा आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले होते की, औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानमधील वाघ गुजरातला घेऊन जाणार अशी माहिती मिळाली आहे. तसेच वाघाच्या बदल्यात औरंगाबाद सिद्धार्थ उद्यानात कोल्हा देणार अशी माहिती आहे. मात्र यासाठी आम्ही सिद्धार्थ उद्यानातील वाघ कदापिही गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही. राज्यभरातून सिद्धार्थ उद्यानात पर्यटक येतात. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील वाघ जर गुजरातला नेला तर, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता.
संबंधित बातम्या:
Aurangabad: औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानातील 'वाघा'वरून राजकारण तापलं; काँग्रेसची आक्रमक भूमिका